पवनी रोडवरील निष्टी हनुमान मंदिराजवळ 'मृत्यूचा सापळा'; बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
खड्डा तात्काळ न बुजवल्यास तीव्र निदर्शने करणार - धनराज उपरीकर,संजय पुरी वैकुंठे
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.२५/०४/२०२६ पवनी रोडवरील निष्टी हनुमान मंदिराजवळ असलेल्या जंगल परिसरात रस्त्यावर पडलेला भलामोठा खड्डा सध्या प्रवाशांसाठी 'मृत्यूचा सापळा' ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, हा खड्डा तात्काळ न बुजवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते धनराज उपरीकर व संजय पुरी वैकुंठे यांनी दिला आहे.प्रशासनाचे झोपेचे सोंग? गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे.हा मार्ग वर्दळीचा असून रात्रीच्या वेळी जंगल परिसरातून प्रवास करताना हा खड्डा वाहनधारकांना दिसत नाही.यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे,या धोकादायक ठिकाणी विभागाने साधे 'इशारा फलक' (Warning Boards) देखील लावलेले नाहीत. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, "प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची किंवा बळी जाण्याची वाट पाहत आहे का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.जबाबदारी PWD प्रशासनाचीच! या संदर्भात धनराज उपरीकर व संजय वैकुंठे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,या खड्ड्यामुळे भविष्यात होणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या अपघाताची सर्वस्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनावर असेल.नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवून रस्ता तातडीने दुरुस्त करावा,अशी मागणी त्यांनी केली आहे."हा खड्डा नसून सरळसरळ मृत्यूला आमंत्रण देणारा सापळा आहे. वारंवार तक्रार करूनही विभाग लक्ष द्यायला तयार नाही.जर तात्काळ दुरुस्ती झाली नाही,तर आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल."
धनराज उपरीकर व संजय पुरी वैकुंठे आता या इशाऱ्यानंतर तरी सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा होणार का आणि या मृत्यूच्या सापळ्यापासून प्रवाशांची सुटका होणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!