आईवर होणाऱ्या छळाला कंटाळून मुलाने वडिलांवर केला जीवघेणा हल्ला
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील अर्जुनी (तुकुम) येथे कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली असून मुलानेच वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.सदर घटना 20एप्रिल 2026 ला सायंकाळच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, ठकाबाई मारोती दडमल (वय ६४) या आपल्या कुटुंबासह अर्जुनी (तुकुम) येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबात पती मारोती दडमल (वय ७०) व चार मुले असून, दोन मोठे मुले वेगवेगळे राहतात तर संदीप व हरी हे आई-वडिलांसोबत राहतात.
पती मारोती दडमल हे पत्नीला वारंवार विनाकारण त्रास देत असल्याने घरात सतत वाद होत होते. यामुळे मुलगा संदीप व हरी हे वेळोवेळी वडिलांना समज देत होते.
दि. २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास संदीप दडमल हा वरोरा येथून घरी परतल्यानंतर वडिलांशी वाद झाला. आईला का त्रास देता, असे विचारत त्याने संतापाच्या भरात घरातील लोखंडी सळई (सब्बल) घेऊन वडिलांच्या छातीवर वार केला. या घटनेत मारोती दडमल गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर संदीपनेच जखमी वडिलांना मोटारसायकलवरून प्रथम वरोरा येथील सरकारी रुग्णालयात नेले. तेथून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी 21एप्रिल ला ठकाबाई दडमल यांनी पोलीस स्टेशन शेगाव (बु.) येथे तक्रार दिली असून, मुलगा संदीप दडमल याच्याविरोधात शेगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला 21 एप्रिल ला सकाळी अटक करण्यात आली आहे.घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!