दोन दिवसापासून वरोरा तालुक्यातील सरकारी कर्मचारी संपावर

कामे रखडल्यामुळे नागरिकांना मात्र त्रास

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा दुसरा दिवस असून तहसील कार्यालयातील संपूर्ण कामकाज ठप्प झाल्याचे चित्र आहे.
राज्यभर सुरू असलेल्या या आंदोलनाला वरोरा तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी कालपासून एकमुखी प्रतिसाद देत संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाची कामे जसे की जात, उत्पन्न, रहिवासी दाखले, जमीन नोंदी, फेरफार, वारस नोंदणी  पूर्णपणे बंद पडली आहेत.दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी तहसील कार्यालयात येत असतात. मात्र संपामुळे नागरिकांना तासन्तास वाट पाहूनही निराश होऊन परत जावे लागत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले, शेतकऱ्यांची जमीनसंबंधित कामे आणि इतर तातडीची कामे मोठ्या प्रमाणावर रखडली आहेत.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि गट-ड कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, रिक्त पदे तातडीने भरणे, चतुर्थश्रेणी भरतीवरील बंदी उठवणे, तसेच सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य सुविधा देणे या महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे.
याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधित प्रश्नांवर नियमितपणे मुख्यमंत्री स्तरावर चर्चा व्हावी, सेवानिवृत्तीचे वय वाढवावे, तसेच शिक्षकांशी संबंधित काही वादग्रस्त शासन निर्णयांचा पुनर्विचार करावा, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.कर्मचाऱ्यांच्या मते, शासनाने अनेकदा आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळेच आता हा संप अस्तित्वाची लढाई बनल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी कर्मचाऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असल्याने कामकाज सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे.
जोपर्यंत शासन सकारात्मक निर्णय घेत नाही, तोपर्यंत हा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असून, येत्या काही दिवसांत याचा परिणाम संपूर्ण प्रशासन व्यवस्थेवर जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!