55 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदोन्नती – महसूल विभागात ऐतिहासिक निर्णय

55 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदोन्नती – महसूल विभागात ऐतिहासिक निर्णय

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली मोठा निर्णय; प्रशासन अधिक सक्षम होणार


चंद्रपूर | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन च्या महसूल विभागात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील 55 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल खात्याच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी पदोन्नती देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.
राज्याच्या प्रशासनात महसूल विभाग हा अत्यंत महत्त्वाचा कणा मानला जातो. शेतकऱ्यांच्या जमिनीचे हक्क, 7/12 उतारे, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी या विभागामार्फत केली जाते. त्यामुळे विभाग अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे.
मागील वर्षी घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना अनेक प्रशासकीय अडचणींवर मात करून अखेर हा निर्णय पूर्णत्वास नेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निर्णयामुळे नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तत्काळ निर्णय, आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम होणे तसेच प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या निर्णयाबद्दल विविध स्तरातून समाधान व्यक्त केले जात असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयक्षम नेतृत्वाचे कौतुक होत आहे. राज्याच्या विकासाला गती देणारा हा निर्णय ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!