लोकविद्यालय तळोधी (बा) शाळेतील विद्यार्थ्यांची नावे चंद्रावर जाणार

लोकविद्यालय तळोधी (बा) शाळेतील विद्यार्थ्यांची नावे चंद्रावर जाणार 


नागभीड:
 नागभीड तालुक्यातील लोकविद्यालय तळोधी (बा) शाळेतील इयत्ता ५ वी (अ) मधील ४५ विद्यार्थ्यांची व शिक्षकांची नावे थेट चंद्रावर पाठवली जाणार आहेत. NASA या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या Artemis II मोहिमेत त्यांचा ऐतिहासिक सहभाग नोंदवला जाणार आहे.
या विद्यार्थ्यांच्या नावांचे अधिकृत "बोर्डिंग पास" नासाकडून देण्यात आले असून, हा शाळेसाठी गौरवाचा क्षण आहे. नासाने या मोहिमेत “व्हर्च्युअल गेस्ट” म्हणून सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत लोकविद्यालय तळोधी (बा) शाळेने नोंदणी केली होती. यशस्वी नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बोर्डिंग पास प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांची नावे एका एसडी कार्डमध्ये संग्रहित करून ‘ओरियन’ अंतराळयानाद्वारे चंद्राकडे पाठवली जाणार आहेत. मोहिमेचे प्रक्षेपण Kennedy Space Center, फ्लोरिडा येथून एप्रिल २०२६ पूर्वी होण्याची शक्यता आहे. या मोहिमेद्वारे अंतराळवीर सुमारे ६ लाख ८५ हजार मैलांचा प्रवास करून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालतील व पॅसिफिक महासागरात सुरक्षित परततील.
या उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक पदवीधर शिक्षक संतोष नन्नावार व मुख्याध्यापक प्रकाश बुराडे यांचीही नावे समाविष्ट आहेत. या अभिनव उपक्रमामागे ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य पुरस्कार’ प्राप्त शिक्षक संतोष नन्नावार यांची दूरदृष्टी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची तळमळ स्पष्ट दिसून येते.
Artemis program अंतर्गत ही मोहीम मानवाला पुन्हा चंद्रावर नेण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे. सुमारे ५४ वर्षांनंतर नासा पुन्हा अंतराळवीरांना चंद्र मोहिमेसाठी पाठवत आहे.
                 या उल्लेखनीय यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी संजय पालवे , दि रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्हि.एस. तोंडरे, सचिव आर.एस.राऊत, सर्व पालक यांनी लोकविद्यालय तळोधी (बा) शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!