इराण–इस्त्राईल युद्धाची झळ; मूलमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
मध्यपूर्वेतील इराण–इस्त्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस टंचाईची झळ आता मूल शहरातील नागरिकांना बसू लागली आहे. मागील तीन दिवसांपासून गॅस सिलेंडरची गाडी न आल्याने शहरातील गॅस एजन्सीसमोर नागरिकांनी सिलेंडरसह लांबच लांब रांगा लावल्या आहेत.
दोन दिवस नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने आज एजन्सी परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सिलेंडर मिळेल की नाही या चिंतेमुळे अनेक नागरिक सकाळपासूनच एजन्सीसमोर थांबून आहेत.
याबाबत तहसीलदार मृदुला मोरे यांनी सांगितले की, ऑनलाइन बुकिंग होत नसल्याच्या काही तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान पुरवठा अधिकारी शिरभाते यांनी सांगितले की, तांत्रिक अडचणीमुळे मागील तीन दिवसांपासून सिलेंडरची गाडी आलेली नाही. मात्र आज दुपारी तीन नंतर सिलेंडरचा पुरवठा होणार असून नागरिकांना लवकरच गॅस उपलब्ध होईल. कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून प्रशासनाचे वतीने स्वतः एजन्सीला भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले.
तथापि, तीन दिवसांपासून सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून अनेकांना स्वयंपाकासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर नियमित पुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मूल शहराला स्वतंत्र गॅस एजन्सी नाही
मूल शहरातील गॅस एजन्सी मध्ये गॅस चोरी करताना स्फोट झाल्याने, या एजन्सी कडे असलेले मुल तालुक्यातील ग्राहक चिचपल्ली आणि सावली या दोन गॅस एजन्सीना जोडले आहे. यामुळेही सिलेंडर वाटपात विलंब होत असल्याचा आरोप केला जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!