काँग्रेस विचारधारा हि कधी न संपणारी – विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार

चिमूर येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक उत्साहात 

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चिमूर येथे दिनांक. ०१/०३/२०२६ ला आयोजित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत पक्षाच्या विचारधारेचा ठामपणे पुनरुच्चार करीत “काँग्रेस पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे. काँग्रेसची विचारधारा कधीही संपणार नाही,” असे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.काँग्रेस पक्षाचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजुरकर व त्यांचे बंधू सतीश वारजुरकर यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडून भाजप मध्ये प्रवेश केला. यावरून काँग्रेसला जिल्ह्यात धक्का बसल्याचे वृत्त सर्वत्र पसरविण्यात आले. मात्र आज विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी चिमूर येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीस चिमूर विधानसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थित होती. यावेळी मंचावरील जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी यांनी वारजुरकर कुटुंबीयांचा सत्ता काळ,कार्यकर्त्यांना मिळालेली दुटप्पी वागणूक, व वेळोवेळी केलेल्या पक्षविरोधी कार्यवाहींचा पाढा वाचला. 
पक्षाने एवढे काही देऊनही पक्षाची साथ सोडणारे स्वार्थी गेल्याने काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या क्रांतीभूमी चिमूर मधे येत्या काळात नवीसंजीवनी मिळणार असे मत काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. गावागावात पक्षाचे धोरण व जनकल्याणकारी भूमिका पोहोचविण्यासाठी सक्रिय राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. शेतकरी, कामगार, महिला व युवकांच्या प्रश्नांवर काँग्रेस नेहमीच ठामपणे उभी राहिली असून पुढेही जनतेच्या हितासाठी संघर्ष सुरूच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या. पाणीटंचाई, रस्ते, बेरोजगारी यांसारख्या विषयांवर चर्चा झाली. वडेट्टीवार यांनी या प्रश्नांवर शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीला डॉ. विजय पाटील गावंडे, राम राऊत, धनराज मुंगले, विनोद बोरकर, दिगंबर गुरपुडे, गजानन बुटके, रमाकांत लोधे, किशोर शिंगरे, कृष्णा तपासे, प्रफुल खापर्डे, जुनेद खान, माधव बिरजे, विजय पाटील झाडे, शांताराम सेलवटकर, रोशन ढोक, सचिन गाडीवार, डॉ. संजय बोडे, ऍड. धनराज वंजारी, आरीफभाई शेख, नागेश चट्टे यासह तालुका व शहरातील काँग्रेस पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!