मूल वार्ड नं16 येथे पाच विकास कामांना मंजुरी रा.काॅं.आकाश येसनकर यांच्या पाठपुराव्याला यश
मूल वार्ड नं16 येथे पाच विकास कामांना मंजुरी
रा.काॅं.आकाश येसनकर यांच्या पाठपुराव्याला यश
मुल : शहरातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर अखेर सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. नगरपरिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश येसनकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एकूण पाच महत्त्वपूर्ण कामांना हिरवा कंदील मिळाला आहे. यापैकी वॉर्ड क्रमांक १६ मधील अनिल बनकर यांच्या घरापासून दुर्गा माता मंदिरापर्यंतच्या सिमेंट काँक्रीट नाली बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
वॉर्ड क्रमांक १६ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नालीअभावी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, रस्त्यांवर चिखल होणे तसेच नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागणे अशा समस्या कायम होत्या. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत शहराध्यक्ष आकाश येसनकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर नगरपरिषद सभेत मंजुरी मिळाल्यानंतर या नाली बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असून नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
याच सभेत शहरातील इतरही काही महत्त्वपूर्ण विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. वॉर्ड १६ मधील बौद्ध विहाराजवळील अर्धवट राहिलेले नाली बांधकाम पूर्ण करून दोन्ही रस्ते जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये अक्षय दुमावार व सचिन बांबोळे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वॉर्ड १६ मधील आदिवासी वस्तीतील हनुमान मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात पाणी व वीजपुरवठ्याची व्यवस्था सुरळीत करण्यासह पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचाही निर्णय सभेत घेण्यात आला आहे. यासोबतच वॉर्ड १६ मध्ये सिमेंट काँक्रीट नाली बांधकामाचा समावेश असलेली इतर कामेही मंजूर करण्यात आली आहेत.
या सर्व कामांमुळे शहरातील स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार, आमदार इंद्रनील नाईक, पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यामुळे शहरातील विकासकामांना गती मिळत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत समाधान व्यक्त केले असून आगामी काळातही शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या कामांसाठी मुल नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!