सार्वजनिक पाण्याचा बेकायदेशीर वापर? पाणीपुरवठा सभापतीच आरोपीच्या पिंजऱ्यात!

सार्वजनिक पाण्याचा बेकायदेशीर वापर? पाणीपुरवठा सभापतीच आरोपीच्या पिंजऱ्यात!

पाणी पुरवठा समितीचे सभापतीच संशयाच्या भोवऱ्यात


✍️ विजय सिद्धावार
मूल |
मुल नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती विलास कागदेलवार हे आपल्या नवीन घराचे बांधकामासाठी नगरपरिषदेच्या सार्वजनिक मालकीच्या बोरवेलला खाजगी मोटर पंप लावून घराचे बांधकामासाठी मागील दोन वर्षापासून पाणी वापरत असल्याची गंभीर तक्रार आज नगर परिषदेला करण्यात आली.

मूल नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून विलास कागदेलवार हे नगरसेवक म्हणून निर्वाचित झाले आहेत. सध्या ते नगर परिषदेच्या पाणी पुरवठा समितीचे सभापती म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, याच पदाधिकाऱ्याच्या बाबतीत नगर परिषदेच्या सार्वजनिक बोअरवेलमधून बेकायदेशीररीत्या पाणी उपसा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

भाजपाच्या वतीने आज नगर परिषदेत दाखल करण्यात आलेल्या लेखी तक्रारीनुसार, विलास कागदेलवार यांच्या नव्याने सुरू असलेल्या घरबांधकामासाठी सार्वजनिक बोअरवेलवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता खाजगी मोटरपंप बसवण्यात आला असून त्याद्वारे पाणी वापर केला जात आहे. हा प्रकार महाराष्ट्र नगर परिषदा अधिनियम तसेच पाणीपुरवठा नियमावलीनुसार बेकायदेशीर ठरतो.

विशेष बाब म्हणजे, ज्या समितीवर शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियमन, संरक्षण व शिस्त राखण्याची जबाबदारी आहे, त्याच समितीचा सभापती संशयित ठरत असल्याने ‘हितसंबंधांचा संघर्ष’ (Conflict of Interest) स्पष्टपणे दिसून येतो.

आज पाणी पुरवठा समितीची अधिकृत बैठक सुरू असतानाच, आपल्या विरोधात तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळताच विलास कागदेलवार यांनी “अर्जंट काम” असल्याचे कारण देत बैठक अर्धवट सोडल्याची माहिती समोर आली आहे. ही बाबही प्रशासनिक शिस्त व उत्तरदायित्वाच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे.

उल्लेखनीय म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी बिरजू शेख कुटुंबावर अशाच प्रकारे नगर परिषदेच्या बोअरवेलमधून बेकायदेशीर पाणी उपसा केल्याप्रकरणी कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे, समान गुन्ह्यासाठी समान कारवाई होणार का? हा मूलभूत कायदेशीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

विलास कागदेलवार हे यापूर्वी मूल नगर परिषदेच्या आस्थापनेत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, ते सेवेत असतानाच या ठिकाणी पाणी उपशाचा प्रकार सुरू होता. ही बाब खरी ठरल्यास, तो केवळ नियमभंग नव्हे तर पदाचा गैरवापर आणि दीर्घकालीन बेकायदेशीर लाभाचा संशय निर्माण करणारा प्रकार ठरू शकतो.

याशिवाय, नगर परिषदेचे नळजोडणी कंत्राटदार अशा बेकायदेशीर कनेक्शनसाठी जबाबदार असल्याची माहिती वारंवार समोर येत असून, या प्रकरणातही कंत्राटदाराची भूमिका तपासण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

आता या संपूर्ण प्रकरणात मुख्याधिकारी संदीप दोडे कायदेशीर तरतुदीनुसार निष्पक्ष चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करणार की सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली प्रकरणाकडे दुर्लक्ष होणार, याकडे संपूर्ण मूल शहराचे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात मुख्याधिकारी दोडे  यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!