सत्ताधाऱ्यांनो, विनोद कामडींने उघड केलेल्या भ्रष्टाचारावर कारवाई करणार काय?
सत्ताधाऱ्यांनो, विनोद कामडींने उघड केलेल्या भ्रष्टाचारावर कारवाई करणार काय?
✍️ संपादकीय
२०१७ मध्ये मूल नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने अध्यक्ष पदासह १७ पैकी १६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्या सत्तेच्या भिंतीत एकच खिंडार होते— विनोद कामडी. काँग्रेसचा एकमेव नगरसेवक, पण सत्ताधाऱ्यांसाठी कायम अस्वस्थ करणारा आवाज.
संख्याबळ शून्य, पण प्रश्न विचारण्याची हिंमत अफाट. युवक असलेले विनोद कामडी यांनी सत्तेच्या सावलीत चाललेल्या भ्रष्टाचाराविरोधात एकहाती लढा दिला. विशेषतः ‘न लावलेल्या झाडांचे प्रकरण’ हे त्यांचे धाडस आजही स्मरणात आहे. कागदावर दाखवलेली झाडे प्रत्यक्षात कुठेच नव्हती—आणि हे सिद्ध करण्यासाठी विनोद कामडी केवळ सभागृहात भाषणे करत बसले नाहीत. ते स्वतः मोक्यावर गेले, स्केल लावला, झाडांची उंची मोजली आणि लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे समोर आणले.
त्या काळात काँग्रेस पक्षही त्यांच्यामागे ठामपणे उभा राहिला नाही. तरीही त्यांनी संघर्ष थांबवला नाही. सत्ता, पदाधिकारी, दबाव—कशालाही न घाबरता त्यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड केला. ‘पब्लिक पंचनामा’ ने या लढ्याला व्यासपीठ दिले, पण व्यवस्थेने मात्र कानाडोळा केला.
दुर्दैवाने, या प्रकरणांवर कारवाई होण्याआधीच विनोद कामडी यांचे अकाली निधन झाले. त्यांच्यासोबतच प्रश्नही दफन झाले. फाईली बंद झाल्या. दोषी मोकळे राहिले. आणि प्रामाणिक लढा “असुविधाजनक इतिहास” ठरला.
आज परिस्थिती बदलली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आली आहे. विनोद कामडी आज हयात नसले, तरी त्यांनी भाजपाविरोधात निर्माण केलेला जनमताचा प्रवाह काँग्रेसच्या दैदीप्यमान विजयामागे आहे, हे वास्तव नाकारता येत नाही.
काँग्रेस सत्तेत आल्यानंतर, स्व. विनोद कामडी यांनी उघड केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना पुन्हा बाहेर काढून, या प्रकरणात भ्रष्टाचार करणार्यावर कारवाई करणार का?
दोषींवर कारवाई झाली, तर ती सूडाची नव्हे—न्यायाची कारवाई ठरेल. ती कारवाई झाली, तरच स्व. विनोद कामडींच्या संघर्षाला अर्थ मिळेल. अन्यथा सत्ता बदलली असे म्हणायचे, पण व्यवस्था तीच राहिली असेच म्हणावे लागेल.
सत्तेची खरी कसोटी ही विरोधात असताना दिलेल्या आश्वासनांची आठवण ठेवण्यात असते.
काँग्रेस ही कसोटी पास करणार का?



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!