चांदली बुज. येथील अतिक्रमण हटविणार - वनहक्क समितीचा शिवारफेरीत निर्धार




सावली - वन विभागाची जमीन सामूहिक वनहक्क कायद्याद्वारे ग्रामसभेला मिळाली आहे. त्या सामूहिक जमीनीचे नियोजन करण्याच्या उद्देशाने चांदली बुज. येथील वनहक्क समितीने मिळालेल्या वनजमिनीत शिवार फेरी काढून सभा घेतली. यावेळी सिमा निश्चित करून हक्काच्या जमिनीत असलेले अतिक्रमन काढण्याचा निर्धार केला. 
          अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी कायदा २००६ अंतर्गत जंगलावर अवलंबून असणाऱ्या गावांना सामूहिक वनजमीन दिल्या जाते. तालुक्यातील चांदली बुज. येथील वनहक्क समितीला वनक्षेत्रातील ३४.०३  हेक्टर जमीन सामूहिक वनहक्क पट्टा मिळाला आहे. गावातील वनहक्क समिती ही ग्रामसभेच्या माध्यमातून सामूहिक वनजमिनीवर वृक्षारोपण, वनसंवर्धन करणार असून त्यातून मिळालेल्या वनउपजच्या उत्पन्नातून गावाचा विकास साधणार आहे. सामूहिक वनजमिनीतून शिवार फेरी काढण्यात आली व त्याच ठिकाणी सभा घेऊन अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला व नियोजन आराखडा तयार करण्यात आला. यावेळी सरपंच विठ्ठल येगावार, वनहक्क समिती अध्यक्ष सिताराम कोडापे, पोलीस पाटील चिंतामण बालमवार, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप मोहुर्ले, वनहक्क समिती सचिव विलास येनगंटीवार, ग्राम अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण, तलाठी वैभव निशांकर, ग्रामपंचायत पदाधिकारी, आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रतिनिधी, वनविभागाचे प्रतिनिधी, गावातील महिला, पुरुष, बचत गटाचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!