नागभीड अंतर्गत तळोधी बीटस्तरीय शालेय बालक्रिडा तथा सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन
किटाळी बोरमाळा येथील स्व. वासुदेवजी ठाकरे परीसरात आयोजित पंचायत समिती नागभीड अंतर्गत तळोधी बीटस्तरीय शालेय बालक्रिडा तथा सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद चे माजी सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते पार पडले. लेझीम पथकासह कार्यक्रम स्थळी आगमन झाल्यानंतर क्रिडाज्योत प्रज्वलीत करुन या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यात २० जि.प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी पथसंचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली.
या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद चे माजी सदस्य खोजराम मरसकोल्हे होते तर सहउद्घाटक पदी सरपंच छगन कोलते यांची उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून माजी गटशिक्षणाधिकारी अरविंद चिलबुले यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून जनकापुर च्या सरपंच सौ. वैशालीताई गायधने , शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष दिपक ठाकरे व उपाध्यक्ष प्रमोद सातपैसे , तंटामुक्त समिती अध्यक्ष रेवनाथ निकुरे , कृष्णाजी समर्थ, सदाशिव नागापुरे,रविन्द्र नागोसे व ग्रामपंचायत सदस्य यांची मंचावर उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना संजय गजपुरे यांनी जीवनात पुढे काय करायचे हे आताच ठरवा व त्या ध्येयाच्या लक्ष्यपुर्तीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा , यश तुमच्या दारात येईल असे प्रतिपादन केले . सोबतच तुमचे जीवन सुखकर व्हावे म्हणून कष्ट करीत तुम्हाला सर्व सुखसोयी पुरविणाऱ्या आईवडीलांना कधीही अंतर देऊ नका असा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
उद्घाटन सोहळा दरम्यान विविध शाळांनी सामाजिक संदेश देणाऱ्या दार्शनिक कवायतींचे सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकली. या संमेलनाचे प्रास्ताविक संमेलनाध्यक्ष व नागभीड चे गटशिक्षणाधिकारी संजय पालवे यांनी केले. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते जगदिश सडमाके यांनी किटाळी चे सरपंच छगन कोलते यांच्या अध्यक्षतेत केले. तर बक्षिस वितरण समारंभ नागभीडच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. प्रियाताई लांबट यांच्या हस्ते व सरपंच छगन कोलते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
सांस्कृतिक स्पर्धेचे विजेतेपद तळोधी ( बा.)शाळेने पटकावले तर प्राथमिक ची जनरल चॅम्पियनशिप पळसगाव खुर्द व माध्यमिक ची जनरल चॅम्पियनशिप किटाळी बोरमाळा शाळेने पटकावले. विविध स्पर्धांमध्ये प्रथम आलेल्या शाळा व विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय क्रिडा सोहळ्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे. किटाळी बोरमाळा वासियांनी केलेल्या या सोहळ्यात निवास व भोजन व्यवस्था उत्तम करण्यात आली होती.
या संपूर्ण सोहळ्याचे संचलन सहा.शिक्षक संतोष वाटगुरे व सौ. वनमाला चिलबुले मॅडम यांनी केले. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक प्रदिप मोटघरे यांनी मानले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी केंद्रप्रमुख प्रदिप मोटघरे व भारत बोरकर यांच्यासह सर्व मुख्याध्यापक , शिक्षक, गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त समिती, सर्व युवक मंडळे , महिला व पुरुष बचतगट मंडळे यांनी सहकार्य केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!