"या" कारणाने मतदारांचा काँग्रेसवर रोष
"या" कारणाने मतदारांचा काँग्रेसवर रोष
न्यायालयीन लढाईचा बागुलबोवा उभा करून निवडणूक लांबविल्याचा आरोप
मूल शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील निवडणूक ही यावेळी केवळ राजकीय लढत न राहता, न्यायालयीन लढाईचा बागुलबोवा उभा करून निवडणूक पुढे ढकलण्याच्या राजकारणाचे उदाहरण ठरत असल्याची तीव्र चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. याच कारणामुळे काँग्रेस उमेदवारांविरोधात प्रभागातील मतदारांमध्ये प्रचंड रोष असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे.
जनसामान्यांचे उमेदवार, सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले निलेश राय हे निवडून येऊ नयेत, यासाठी काँग्रेस उमेदवार व काही प्रस्थापित नेत्यांनी थेट लढत टाळून न्यायालयीन मार्गाचा आधार घेतल्याचा आरोप होत आहे. नगरसेवक पदाच्या शर्यतीतून राय यांना बाहेर ठेवण्यासाठी त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला. मात्र हा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला.
इतकेच नव्हे, तर कायदेशीरदृष्ट्या हे प्रकरण टिकणार नसल्याचे माहीत असतानाही, हे प्रकरण जिल्हा न्यायालयातून थेट उच्च न्यायालयात नेण्यात आले. यामागील उद्देश कायदेशीर विजय नसून, निलेश राय यांना निवडणुकीपासून दूर ठेवणे आणि निवडणूक प्रक्रिया लांबवणे हाच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अखेर न्यायालयीन आदेशामुळे हा प्रयत्न अपयशी ठरला.
या संपूर्ण प्रक्रियेचा फटका मात्र थेट प्रभाग १० मधील मतदारांना बसला. शहरातील इतर सर्व प्रभागांतील निवडणुका दोन तारखेला शांततेत पार पडल्या असताना, केवळ काँग्रेस उमेदवाराच्या अट्टहासामुळे प्रभाग १० मधील मतदारांना वीस डिसेंबरपर्यंत मतदानासाठी वाट पाहावी लागली. या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
“थेट लढतीला घाबरून उमेदवारी रद्द करण्यासाठी आटापिटा केला गेला,” अशी भावना मतदारांमध्ये पसरत असून, यामुळेच काँग्रेस उमेदवाराला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, निलेश राय यांचा प्रभागातील प्रभाव इतका प्रबळ आहे की काँग्रेसला स्वतःच्या पक्षातून त्यांना टक्कर देऊ शकेल असा उमेदवारही मिळू शकला नाही, अशी चर्चा उघडपणे होत आहे.
अखेर काँग्रेसला भाजपातून उमेदवाराची आयात करावी लागली, ही बाब पक्षासाठी राजकीय नामुष्की मानली जात असून, “निवडणूकीला सामोरे जाऊन वाढण्याऐवजी न्यायालयीन लढाईवर भर देणारे राजकारण” अशी काँग्रेसची प्रतिमा मतदारांमध्ये तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रभाग १० मधील निवडणूक आता केवळ स्थानिक प्रश्नांची नसून, लोकशाही प्रक्रियेचा आदर विरुद्ध न्यायालयीन खेळी यामधील संघर्ष म्हणून पाहिली जात आहे. त्यामुळेच काँग्रेसविरोधातील मतदारांचा रोष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याची चर्चा मूल शहरात जोर धरत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!