शोभाताईंच्या भूमिकेमुळे काँग्रेसला धक्का; भाजपाचा गड आणखी मजबूत
शोभाताईंच्या भूमिकेमुळे काँग्रेसला धक्का; भाजपाचा गड आणखी मजबूत
मूल: “मी भाजपाची असून भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहे. तब्येत ठीक नसल्याने या काळात मी कुणालाही भेटले नाही, त्यामुळे भाजपाची उमेदवारी प्रा. किरण कापगाते यांना कुणामुळे मिळाली हे मला माहिती नाही,” असे स्पष्ट मत माजी मंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केले. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या उमेदवाराच्या अडचणीत भर पडली आहे.
मागील काही महिन्यांपासून काँग्रेसचे सध्याचे उमेदवार आणि भाजपाचे माजी कार्यकर्ते प्रशांत समर्थ हे शोभाताई फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. समर्थ यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर आणि उमेदवारीनंतर, शोभाताई कोणत्या बाजूचा झेंडा उचलतील याबाबत मतदारांमध्ये तर्क-वितर्क सुरू होते. मात्र आता शोभाताईंनी स्वतः पत्रकारांसमोर भाजपाच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याचे जाहीर करताच काँग्रेसच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
फडणवीस कुटुंबाचा पिढीजात वाडा प्रभाग क्रमांक १ मध्ये असून, हा परिसर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पितृक घर म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळे हा प्रभाग नेहमीच भाजपाच्या बाजूने मतदान करतो, अशी धारणा मतदारांमध्ये दिसून येते. आगामी निवडणुकीत या परंपरेला तडा जातो की काय? याकडे सर्वांचे लक्ष होते.
मात्र शोभाताई फडणवीस यांनी स्पष्टपणे भाजपाच्या उमेदवाराच्या बाजूने प्रचार करण्याची भूमिका जाहीर केल्याने, या प्रभागात भाजपाचाच गड कायम राहील, अशी शक्यता आता अधिक बळावली आहे. परिणामी काँग्रेस उमेदवार प्रशांत समर्थ यांची अडचण आणखी वाढली असून संपूर्ण राजकीय समीकरणालाच वेगळा रंग चढला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!