ऐतिहासिक निर्णय : चिरोली ग्रामसभेने एकमताने ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा ठराव मंजूर
ऐतिहासिक निर्णय : चिरोली ग्रामसभेने एकमताने ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा ठराव मंजूर
प्रतिनिधी, मूल | दिनांक : 7 नोव्हेंबर 2025
मूल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चिरोली ग्रामपंचायतीत दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी सुभाष बुक्कावार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत गावकऱ्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेत ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.
गावकऱ्यांनी सभेत लेखी निवेदन सादर करून सांगितले की, विद्यमान ग्रामपंचायत कमिटी कर्तव्यात कसूर करीत असून, अकार्यक्षमता, गैरव्यवहार आणि निष्क्रिय कारभार यामुळे गावाच्या विकासकामांना अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर कमिटी बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
सभेत मांडलेला हा ठराव 105 ग्रामसभेतील उपस्थित सदस्यांनी एकमताने मंजूर केला. ग्रामसेवकांनी या वेळी स्पष्ट केले की, सरपंच, उपसरपंच आणि काही सदस्य सतत ग्रामसभांना गैरहजर राहत असल्याने विकासकामांची प्रगती थांबली आहे.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 145 नुसार ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करण्याचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.
राज्यातील ही पहिलीच ग्रामसभा आहे जिने अशा प्रकारे संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करण्याचा ठराव एकमताने मंजूर करून इतिहास घडविला आहे. या निर्णयाने ग्रामपातळीवरील लोकशाही जागरूकतेचे नवे पर्व सुरू झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
गावकऱ्यांचा ठाम आवाज — “गैरकारभार सहन करणार नाही!”
ग्रामसभेतील उपस्थित नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला की, ग्रामपंचायतीतील अनियमितता आणि निष्क्रियतेविरुद्ध गाव आता संविधानिक मार्गाने ठोस भूमिका घेणार आहे.
“ग्रामपंचायत ही लोकशाहीची पहिली पायरी आहे; तीच जर निष्क्रिय झाली तर गावाचा विकास खुंटतो,” — असा सूर सभेत अनेक नागरिकांनी मांडला.
.jpeg)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!