“कॉंग्रेसच्या नगराध्यक्षपदासाठी शुभांगीनी वैरागडे चर्चेत; वैरागडे कुटुंबाचा राजकीय वारसा पुन्हा झळकणार?”

 “शिक्षणातून समाजसेवा, आता राजकारणात पाऊल; शुभांगीनी वैरागडेंच्या नावावर मूलमध्ये खळबळ!”

मूलच्या नगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून सौ. शुभांगीनी वैरागडे यांची दावेदारी — शहराच्या राजकारणात नवे समीकरण!

मूल | विजय सिध्दावार

मूल नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत आता नव्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत सौ. शुभांगीनी वैरागडे. कॉंग्रेसकडून नगराध्यक्षपदाच्या संभाव्य दावेदार म्हणून त्यांचे नाव चर्चेत येत असून, त्यांना उमेदवारी मिळाल्यास विजयाचा मार्ग तुलनेने सोपा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सौ. वैरागडे या मूल शहरातील ज्येष्ठ वकील अॅड. अनिल वैरागडे यांच्या पत्नी आहेत. अॅड. वैरागडे तसेच त्यांचे पुतणे अॅड. प्रणव वैरागडे यांचा शहरातील सर्व समाजघटकांमध्ये चांगला संपर्क असून, मोठा चाहता वर्ग आहे. वैरागडे कुटुंब हे मूल शहरातील बहुसंख्य तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणारे घराणे असल्याने त्यांची उमेदवारी बहुजन समाजाचा पाठिंबा मिळवणारी ठरू शकते. त्यामुळेच त्यांच्या नावाला राजकीय समीकरणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सौ. शुभांगीनी वैरागडे या मूल ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच डॉ. मा. मा. वैरागडे यांच्या सून असून, आता त्या राजकारणाच्या रिंगणात उतरून घराण्याचा राजकीय वारसा पुढे नेतील काय? असा प्रश्न मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

अॅड. अनिल वैरागडे हे तालुक्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेचे — शिक्षण प्रसारक मंडळ, मूल — अध्यक्ष आहेत. त्यामुळे सौ. वैरागडे यांच्या उमेदवारीस मोठी शैक्षणिक आणि सामाजिक यंत्रणा पाठबळ देऊ शकते. निवडणूकीसाठी लागणारी शहरभर यंत्रणा त्यांचेकडे आहे.

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका म्हणून नवभारत कन्या विद्यालय, मूल येथे त्यांनी दीर्घकाळ कार्य केले असून, विद्यार्थ्याभिमुख कार्यशैली आणि समाजातील सौम्य पण ठाम व्यक्तिमत्वामुळे त्यांना व्यापक आदर मिळालेला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या काळात सर्व शाळा बंद असताना ग्रामीण मुलींचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांनी धाडसी निर्णय घेत, सर्व खबरदारी पाळत शाळा सुरू ठेवली होती. त्यांच्या या निर्णयाचे त्या काळात सर्व स्तरातून कौतुक झाले होते.

राजकीयदृष्ट्या पाहता, सौ. वैरागडे या कॉंग्रेसचे वजनदार आमदार अभिजीत वंजारी यांच्या अत्यंत जवळच्या नात्यातील असून, पक्षसंघटनेतील त्यांचा प्रभावही लक्षणीय आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्यास फारशी अडचण येणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सध्या नगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडे प्रभावी आणि स्वीकारार्ह चेहरा नसल्याच्या पार्श्वभूमीवर सौ. शुभांगीनी वैरागडे यांची दावेदारी पुढे आल्याने मूलच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!