निष्ठावंतांना नारळ उपर्यांना संधी काँग्रेसचे विष्णू सादमवार यांनी घेतला "धनुष्यबाण"
निष्ठावंतांना नारळ उपर्यांना संधी
काँग्रेसचे विष्णू सादमवार यांनी घेतला "धनुष्यबाण"
प्रभाग एक मधील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले विष्णू सादमवार यांना यावेळी नगरपरिषदेत नगरसेवकाची उमेदवारी देण्याचा काँग्रेस नेतृत्वानी शब्द दिला होता. मात्र ऐनवेळी भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले प्रशांत समर्थ यांना प्रभाग एक मधून उमेदवारी देत विष्णू सादमवार यांना डावल्याने, त्यानी बंडखोरीचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे काँग्रेस गोटात खळबळ उडाली असून त्याची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कळते. मात्र आपल्यावर अन्याय झाला असून आपण मैदानात कायम आहोत अशी भूमिका त्यांनी पब्लिक पंचनामाशी बोलताना व्यक्त केली.
उल्लेखनीय म्हणजे, विष्णू सादमवार हे प्रभाग एक मधील रहिवासी आहेत तर भाजपातून येऊन काँग्रेसचे उमेदवारी मिळविणारे प्रशांत समर्थ हे प्रभाग पाच मधील मतदार आहेत. स्थानिक प्रभागाचा रहिवासी मतदार असतानाही डावलल्याचे शल्य विष्णू सादमवार यांना आहे. सादमवार परिवार हे मुल शहरातील नामांकित कुटुंब असून शहराच्या मध्यवर्ती भागात ते पूजेचे सामान विक्री करून धर्म आणि संस्कृती संवर्धनाचे काम करीत असल्याने संपूर्ण मूल शहरात या कुटुंबाबद्दल आदर आहे.
आपल्याला प्रभाग एक मधून उमेदवारी देण्याचे मान्य केल्याने मागील काही महिन्यापासून आपण तशी तयारी आपण केली होती मात्र काँग्रेसने भाजपातून आलेल्या एकाच कुटुंबातील दोघांना संधी देऊन मूळ कांग्रेसी कार्यकर्त्यावर अन्याय करत असल्याने आपण आरपारची लढाई लढत असल्याचे त्यांनी सांगितले. विष्णू सादमवार हे बँकेचे अभिकर्ता म्हणून मूल शहरात विविध प्रभागांमध्ये नियमित जनसंपर्क साधून असतात, त्यांनी काँग्रेसची साथ सोडल्यामुळे याचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसण्याची शक्यता असल्याचे राजकीय गोटात व्यक्त केले जात आहे.
यापूर्वीच प्रभाग 10 मध्ये काँग्रेसकडून तयारी करीत असलेले संदीप मोहाबे यांना ऐनवेळी डावलून भाजपातून आलेल्या राहुल प्रेमलवार यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले संदीप मोहाबे यांनी भाजपाचा दुपट्टा गळ्यात टाकला. त्यामुळे काँग्रेसला आधीच झटका बसल्यानंतर विष्णू सादमवार यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसची प्रभाग एक मधील अडचण वाढताना दिसत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!