मौजा वलणी (चौ) येथे मंडई उत्सवाची धूम; ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रम ठरणार मुख्य आकर्षण

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - भंडारा जिल्ह्यात झाडीपट्टीतील ग्रामीण परंपरेचा आणि लोककलेचा अविभाज्य भाग असलेला मंडई उत्सव यंदा आज दिनांक.२६ ऑक्टोंबरला मौजा वलणी (चौ) येथे थाटात साजरा केला जाणार आहे. वर्षभर शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा उत्सव म्हणजे करमणूक,  आणि आनंदाचा क्षण ठरतो.या मंडईत पारंपरिक दंडार, नाटक, आखाडा, झांकी यांसारख्या लोककला सादर केल्या जातात. तसेच गावात नवीन जोडप्यांची ओळख, लग्नासाठी वधू व वर पाहणी, नव्या जावयांचा सत्कार असे सामाजिक उपक्रमही रंगतदार वातावरणात पार पडतात.या वर्षीचा उत्सव नवतरुण युवा मंडळ नवीन आबादी  यांच्या सौजन्याने तसेच गावातील सर्व सामाजिक संस्था व विविध राजकीय पक्षांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरणार आहे प्रसिद्ध कलाकार रश्मी रामटेके यांचा लावणीचा खास कार्यक्रम “मुजरा माझ्या लावणीचा”. तसेच मंडईमध्ये आखाडा खेळांची प्रात्यक्षिके, अघोरी बाबांचे नृत्य, गोरिला अभिनय, आणि कथासार गोंधळ या सादरीकरणांनी वातावरण रंगणार आहे.बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण या मंडईची आतुरतेने वाट पाहत आहेत. पारंपरिक रंगत, लोककला आणि मनोरंजनाचा संगम असलेला मौजा वलणी (चौ) येथील हा मंडई उत्सव यंदा देखील लोकांना एकत्र आनणारा सांस्कृतिक मेळावा ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!