“प्रभाग एकमध्ये भाजपात एक डझन दावेदार; उमेदवारीसाठी महाभारत सुरू!
“प्रभाग एकमध्ये भाजपात एक डझन दावेदार; उमेदवारीसाठी महाभारत सुरू!
निवडणूक लागो वा न लागो… मूल शहरात राजकारणाचा ताप चढला!
मूल | प्रतिनिधी
नगरपरिषदेच्या निवडणुकीची तारीख अद्याप निश्चित नाही, निवडणूक लागेल की नाही याबद्दलही अनिश्चितता आहे… पण मूल शहरात मात्र राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे! गल्लीपासून ते चौकापर्यंत उमेदवारांच्या चर्चांनी वातावरण रंगले असून, सर्वच पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले आहेत. मात्र, या स्पर्धेत भाजपमध्येच ‘कमळ’ मागणाऱ्यांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक एकमधून तब्बल एक डझन उमेदवारांनी भाजपकडून उमेदवारीचा दावा केला आहे. पब्लिक पंचनामाला या उमेदवारांची अधिकृत यादी मिळाली आहे.
या यादीत मोती टहलियानी, अजय गोगुलवार, प्रविण मोहुर्ले, अनिल संतोषवार, महेश गाजुलवार, चंदू रामशेट्टीवार, सोमनाथ झरकर, रविंद्र बोकारे, संतोष गाजुलवार, बालु कोतपल्लीवार, आशुतोष सादमवार आणि अवि पुरम या 12 जणांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत चुरस आता चांगलीच तापली आहे.
दुसरीकडे काँग्रेसमध्ये इच्छुकांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट नाही. शहराध्यक्ष सुनील शेरकी यांनी “अनेक इच्छुकांचे अर्ज आले आहेत” एवढेच सांगितले. विश्वसनीय सूत्रांनुसार विष्णु सादमवार आणि अन्वर शेख हे प्रभाग एकमधून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ने मात्र आघाडी घेतली असून महेश चौधरी यांना आधीपासूनच मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या प्रभागात भाजपच्या अंतर्गत स्पर्धेबरोबरच तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धनगर समाजाचे अध्यक्ष नितेश मॅकलवार हे देखील प्रभाग एक मधून रिंगणात आहेत. ते कोणत्या पक्षाकडून राहतात याबाबत त्यांनी स्पष्ट सांगितले नाही.
एकूणच, निवडणुकीचा बिगुल वाजला नसतानाही मूल शहरात राजकारणाचा ताप १०३ अंशांवर पोहोचला आहे! गल्लीबोळात चर्चा, मतदारांमध्ये गणितं, आणि नेत्यांच्या डोळ्यांत उमेदवारीची स्वप्नं — अशा राजकीय रंगतदार वातावरणामुळे मूल शहर सध्या ‘मूड इन इलेक्शन’मध्ये आहे!



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!