गडबोरीतील दुसराही बीबट पकडण्यात वन विभागाला यश

वन विभाग व परिसरातील लोकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

तालूका - प्रतिनिधी ( यश कायरकर )

सिंदेवाही : - सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत नवरगांव उपक्षेत्रातील गडबोरी येथे काही दिवसांपूर्वी कु. प्रशिल बबन मानकर (वय ७ वर्ष) या बालकावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची दुःखद घटना घडली होती . बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम राबविण्यात आल्यानंतर तात्काळ वनविभागाने बिबट्याला (नर) जेरबंद केले . मात्र त्यानंतर त्याची जोडीदार मादा बिबट्याने पशुधनावर हल्लाकरून ठार केल्याची घटना उघडकीस आली. बिबट जेरबंदसाठी यशस्वी मोहीम राबविण्यात आली . व आज वनविभागाच्या चमूने मादी बिबट्यालाही पकडण्यात यश मिळवले आहे. 
      २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी गडबोरी गावालगतच्या कोलासुर किल्ल्यावर मादी बिबट्याला (वय अंदाजे ४ वर्षे) नैसर्गिक गोठ्यात जेरबंद करण्यात आले. या दोन्ही बिबट्यांना पुढील कार्यवाहीसाठी TTC चंद्रपूर येथे पाठवण्यात आले आहे.

काय आहे घटना?

दिनांक १८.०९.२०२५ रोजी गडबोरी येथील कु. प्रशिल मानकर हा मुलगा गांवातील सार्वजनिक गणपतीचे दर्शन आणि महाप्रसाद घेऊन आपल्या काकासोबत घराकडे परत येत असताना, नियतक्षेत्र नाचनभट्टी मध्ये वन्यप्राणी बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने मुलाला उचलून गावाजवळील पहाडी भागात ओढत नेऊन ठार मारले होते. गावात भितीजन्य परिस्थिती निर्माण झाली होती . गावकऱ्यांच्या मागणी पुर्तता करण्याचे आश्वासन देत गावकऱ्यांच्या मागणीनुसार वनविभागाने बिबट जेरबंद करण्याची मोहीम राबविली .
वनविभागाची कारवाई
या हृदयद्रावक घटनेनंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार वनविभागाने तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली.
नर बिबट जेरबंद: घटनेनंतर अवघ्या तीन दिवसांत, दि. २१.०९.२०२५ रोजी बिबट (नर) पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला आणि त्याला TTC चंद्रपूर येथे पाठवण्यात आले.

मादी बिबट जेरबंद:
नर बिबट्याला पकडल्यानंतरही वनविभागाच्या चमूने सदर क्षेत्रात असलेल्या बिबट मादीचा मागोवा घेणे सुरूच ठेवले. यासाठी ठिकठिकाणी पिंजरे, ट्रॅप कॅमेरे आणि लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले होते. गडबोरी गावाला लागून असलेल्या कोलासुर किल्ल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नैसर्गिक जनावरांचे गोठे तयार करून बिबट्याला पकडण्याची मोहीम राबवली. याच मोहिमेदरम्यान दि. ०२ आक्टोबर रोजी सकाळी मादी बिबट्या नैसर्गीक गोठ्यामध्ये जेरबंद झाली.

  बेशुद्ध करून सुरक्षितरित्या पकडले:

तात्काळ T.A.T.R. चंद्रपूरच्या टीमला पाचारण करण्यात आले. डॉ. रविकांत खोब्रागडे (पशुवैद्यकीय अधिकारी, W.L.) आणि श्री. अजय मराठे (पोलीस नायक, शुटर) व त्यांच्या चमूने घटनास्थळी पोहोचून रायफलच्या सहाय्याने मादी बिबट्याला बेशुद्ध केले आणि सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद केले. तिलाही TTC चंद्रपूर येथे पाठवण्यात आले आहे.

मोहिमेत सहभाग

सदर मोहीम मा. डॉ. कुमारस्वामी, भा.व.से. (उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी वनविभाग) यांच्यासह मा. डॉ. एम. बी. गायकवाड (सहायक वनसंरक्षक, तेंदू), अरविंद जे., भा.व.से. (सहायक वनसंरक्षक, प्रादे. व वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनाखाली अंजली सायंकार (बोरावार), वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही, यांच्या नेतृत्वात यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
या मोहिमेत राकेश अहुजा (बायोलॉजीस्ट), एन. टी. गडपायले, एस. बि. उसेंडी, पी. एस. मानकर, आर. जी. कोडापे (सर्व क्षेत्र सहायक),  बी. डी. चिकाटे, कु. आर. के. उईके,  आर. एम. सुर्यवंशी (सर्व वनपाल), वनरक्षक राहुल धनविजय, सचिन चौधरी, रूषीकेश जावडे, संतोष पेंदाम, गोकुलदास राठोड, सज्जन पारेकर, ओमप्रकाश चहांदे, श्रीकृष्ण नागरे, कु. माधुरी सुरपाम, अतुल बोरकर, विनोद चिकराम, तसेच स्वाब नेचर फॉडेशनचे अध्यक्ष यश कायरकर व त्यांची बचाव चमू, RRU टीम सिंदेवाही, वाहन चालक रवि मारभते, कमलाकर बोरकुंडवार, सिंदेवाही परिक्षेत्रातील PRT टीम आणि हंगामी मजूर या सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!