गाव प्रादेशिकमध्ये जंगल बफरमध्ये दोन्ही वन विभागाचे अधिकारी आमनेसामने
बफर झोनमध्ये गावे समाविष्ट करण्यासाठी नवेगाव बफर गेटवर धडकले गावकरी
तब्बल सहा तास प्रशासनाने नागरिकास ठेवले वेठीस
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या बरडघाट, पांढरपौनी, झरी येथील नागरीक मागील अनेक वर्षांपासून वन विभागाला समस्या सोडवाव्या अन्यथा नवेगाव निसर्ग पर्यटन द्वार बंद करण्याचा इशारा ६ आक्टोबरला दिलेल्या निवेदनातून देण्यात आला होता. मात्र वन विभागाने यावर सकारात्क पाऊल उचलले नसल्याने अखेर १३ आक्टोबर सोमवारला सकाळी ११.३० वाजता तिनही गाव व परिसरातील शेकडो शेतकरी महिला पुरुष नवेगाव पर्यटन द्वारावर धडकले. यात वरील तीनही गावे बफर झोनमध्ये समाविष्ट करावे ही प्रमुख मागणी गावकऱ्यांची होती. यात गावे ही प्रादेशिक वन विभागात येते तर गावाला लागून असलेले जंगल हे बफर झोनमध्ये येते. त्यामुळं शेतशिवारात एखादी पशु मारले व जंगलात ओढत नेले तर दोन्ही वन विभागाचे अधिकारी एकामेकाकडे बोट दाखवित असतात. त्यामुळं अश्यावेळी गावकऱ्यांची फजिती होते. त्यामुळ या वन विभाग प्रादेशिक व बफर झोन येथील दोन्ही अधिकारी आंदोलनात आमनेसामने येऊन गावकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
तालुक्यात वन्यप्राणी व मानवी संघर्ष वाढलेले आहेत. ज्यामुळे अनेक गावाना संघर्षाचा सामना करावा लागतो. तालुक्यातील बरडघाट, पांढरपौनी, झरी या गावातील विविध प्रलंबीत मागण्या मागील अनेक वर्षांपासून वंचित आहेत. मात्र मागण्या पुर्ण झाले नसल्याने या तिनही गाव व परिसरात वन विभागाविषयी आक्रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मागील आठ दिवसापूर्वी खडसंगी वन परीक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांना निवेदन देण्यात आले त्यात हे तिन्ही गावे बफर झोनमध्ये समाविष्ट करावे, जंगला लगत असलेल्या शेतसीमेवर जाळीचे कुंपण करून देण्यात यावे, जंगला लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या पडीत जमिनीला प्रती वर्ष एकरी ५० हजार रुपये प्रमाणे भाडे तत्वावर घेण्यात यावे, हिंस्त्र प्राणी गावात व शेतशिवारात येत असल्यामुळं वन्य प्राण्यांचे बंदोबस्त करण्यात यावे, बरडघाट, पांढरपौनी, झरी येथील सुशिक्षित बेरोजगारांना जिप्सी मार्गदर्शक म्हणून रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच नविन जिप्सी नोंदणीकरिता परवानगी देण्यात यावी, गावकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना व मनुष्य हानी झाल्यास नुकसान भरपाई बफर झोन मार्फत देण्यात यावे. इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. ह्या सर्व मागण्या आठ दिवसात पूर्ण झाल्या नाही तर नवेगाव बफर झोन येथील निसर्ग पर्यटन गेट बंद आंदोलन १३ ऑक्टोबर पासुन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता.
त्याप्रमाणे तीनही गावातील शेकडो महिला पुरुष शेतकरी तथा नागरीक पारंपारिक वाद्य वाजवुन तथा घोषणा करीत खडसंगी गट ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच प्रमोद श्रीरामे यांच्या नेतृत्वात नवेगाव गेटवर धडकले.
गेटवर धडकल्या नंतर आंदोलकांनी सफारी गेट समोरच ठीय्या दिला. यावेळेस माजी उपसरपंच प्रमोद श्रीरामे, शिवापूर बंदर ग्राम पंचायत माजी उपसरपंच आदित्य वासनिक, जगदीश मेश्राम, विनोद उमरे यांनी वन विभागावर रोष निर्माण करीत आपआपली भुमीका मांडली. आंदोलकांना सहाय्यक वन संरक्षक - साईतन्मय दुबे, खडसंगी बफर वन परीक्षेत्र अधिकारी भारती राऊत सामोरे गेले. त्यावेळेस दुबे यांनी पाळीव प्राण्याच्या व मानवी मृत्यु प्रकरणात नुकसान भरपाई देऊ असे मान्य केले. इतर मागण्या आमच्या स्तरावर नसल्याचे सांगुन वरीष्ठ पातळीवर कळवु असे सांगितले. तथा आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलकांनी जोपर्यंत वरीष्ठ अधिकारी येऊन लेखी स्वरूपात मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका घेतली. याची माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. यानंतर आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम राहून भजन सुरू केले. यावेळेस रोशन बन्सोड, संदिप भोस्कर, मनी रॉय, योगेश गेडाम, रवि कोलते, प्रभाकर दोडके, रामभाऊ मेश्राम, अर्जुन पाटील थुटे, पवन धुर्वे, श्रीकृष्ण कुळसंगे, गजानन शेंडे, रामदास आत्राम, बंडूजी तराडे, शामकला कुडसंगे, नागाबाई चुडाम, सिंधु कुमरे, संगीता दोडके, उषा धुर्वे, मंजुळा बावणे इत्यादीसह शेकडो महिला -पुरुष उपस्थित होते. आंदोलना दरम्यान शांतता व सुव्यवस्था करीता चिमूर , शेगाव, भिसी पोलीस स्टेशन येथील पोलिसांचा उप विभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसर, पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
---------------------------------------------
तब्बल सहा तासानंतर उपसंचालक बफर कुशाग्र पाठक यांची भेट
निवेदनातील सर्व मागण्या या वरिष्ठ स्तरावर असल्याने, वरिष्ठ अधिकारी कुशाग्र पाठक यांना कळविल्यानंतर ते सायंकाळी जवळपास साडेचार वाजता आंदोलनस्थळी पोहचले व तीनही गावकऱ्यांनी मिळून निवेदन दिले त्या सर्व मागण्या वरिष्ठ स्तरावर पाठवून पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. यासाठी गावकऱ्यांनी दोन महिन्याचा अवधी दिला. जर दोन महिन्यात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सरळ पर्यटन गेटला कायमस्वरूपी कुलूप लावू.
प्रमोद श्रीरामे, माजी उपसरपंच
---------------------------------------------
वरिष्ठ स्तरावर तात्काळ मागण्यांचे प्रस्ताव पाठवून यावर उपाययोजना करू.
कुशाग्र पाठक, उपसंचालक बफर झोन
---------------------------------------------
तीनही गावाकडून आपल्याला सभोवताल तार लावण्यासंदर्भात प्रस्ताव आलेला होता. आपण तो प्रस्ताव तात्काळ चंद्रपूर येथील वरिष्ठ स्तरावर वन विभाग कार्यालयाकडे पाठविला आहे. त्याची मंजुरी मिळाली तर लवकरच कामाला सुरुवात करणार आहोत.
किशोर देऊळकर, वन परिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!