“चाकोरीबाहेरील मैत्रीणी” कृतज्ञता सोहळ्यात ॲड. देवयानी मैदमवार यांचा मुंबई (पनवेल) येथे सन्मान
“चाकोरीबाहेरील मैत्रीणी” कृतज्ञता सोहळ्यात ॲड. देवयानी मैदमवार यांचा मुंबई (पनवेल) येथे सन्मान
मूल/चंद्रपूर – मनमुक्त फाऊंडेशन तर्फे मुंबई येथे नुकत्याच झालेल्या “चाकोरीबाहेरील मैत्रीणी – कृतज्ञता सोहळा” या भव्य कार्यक्रमात जळगाव (मूळ गाव – मूल, जि. चंद्रपूर) येथील सामाजिक कार्यकर्त्या, समुपदेशक व युथ मेंटॉर ॲड. देवयानी मैदमवार गोविंदवार यांच्या सामाजिक योगदानाचा यथोचित गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या १० कर्तृत्ववान महिलांमध्ये त्यांची निवड झाली.
या सोहळ्यात राज्यातील नामवंत मान्यवर – मा. मनीषा वर्मा (अपर मुख्य सचिव, प्रशासकीय नाविन्यता व सुशासन, महाराष्ट्र शासन), अंजली ढमाळ (उपसंचालक, मराठी भाषा विभाग, मंत्रालय), आंतरराष्ट्रीय धावपटू व उपआयुक्त ललिता बाबर (नवी मुंबई महापालिका) आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील (संचालिका, अंकुर ट्रस्ट) यांच्या प्रमुख उपस्थितीत ऍड. देवयानी मैदमवार गोविंदवार यांना सन्मान प्रदान करण्यात आला.
देवयानी या आपण फाऊंडेशनच्या सहसंस्थापक व संचालक आहेत. त्यांनी मागील १५ वर्षांत युवकांचे मार्गदर्शन, पालकत्व विषयक प्रशिक्षण, शालेय शिबिरे, समुपदेशन आणि अनुभवाधारित शिक्षण या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांचे जळगाव येथील राहते घर “आयुष्याची प्रयोगशाळा” म्हणून ओळखले जाते. येथे आजवर ४०० हून अधिक युवक-युवतींना जीवनदिशा मिळाली असून अनेकजण उच्चशिक्षणासाठी देश-विदेशात पोहोचले आहेत.
त्यांच्या उपक्रमांमुळे बालक-पालक संवाद दृढ झाला आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नियमितपणे Life Skill Workshops, शिबिरे आणि समुपदेशन सत्रांचे आयोजन केले जाते. घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आलेल्या कुटुंबांना त्यांनी समुपदेशनाद्वारे पुन्हा एकत्र आणले आहे. तसेच शिक्षक व पालक प्रशिक्षण, शालेय शिबिरे आयोजित करणे आणि युवकांना करिअर मार्गदर्शन करणे ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
समुपदेशक, Parenting Coach, Relationship Counselor आणि Child Development Expert या अनेक भूमिकांतून त्यांनी समाजातील विविध स्तरांवर योगदान दिले आहे. शिक्षण, संस्कार आणि आत्मविकास यांचा सुंदर संगम साधून त्यांनी युवक आणि कुटुंबांना आयुष्याचा नवा दृष्टिकोन दिला आहे.
सोहळ्यात मान्यवरांनी देवयानी मैदमवार यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “त्यांचा प्रवास हा केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नाही, तर स्त्रीशक्तीच्या उन्नतीचा दीपस्तंभ आहे.” ऍड. देवयानी मैदमवार यांनी आपल्या मनोगतात या गौरवाचे श्रेय सर्व मुलांना दिले. फक्त स्वतःच्या दोन मुलांचे न करता पालकत्वाचा परीघ वाढवीत इतरांनाही कुटुंबाचा भाग केल्याचे सांगताना जे प्रेम आपल्या पोटच्या २ मुलांकडून मिळते ते आता शेकडो मुलांकडून मिळत असल्याचे सांगितले. हीच खरी श्रीमंती असल्याचे प्रतिपादनाही त्यांनी आपल्या मनोगतात केले. बदलत असलेल्या शिक्षण पद्धती आणि रोजगाराच्या संधीवरही त्यांनी प्रकाश टाकत असताना आता गुणांपेक्षा गुणवत्तेला महत्व दिले जात असल्याचे भाष्य केले. गूगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या सुद्धा उमेदवाराकडे कोणती पदवी आहे यापेक्षा त्याच्याकडे कोणते कौशल्य आहे याला प्राधान्य देत असल्याची माहिती दिली.
अशा प्रकारचे उपक्रम व्हावेत ही संकल्पना डॉ. राजेंद्र कुन्हाडे यांची होती. सोहळ्यात मनमुक्त फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. संचालक अस्मिता कालन, मनिषा कुन्हाडे व मुक्ता भोसले यांच्या प्रयत्नांचे मान्यवरांनी कौतुक केले. तसेच, मनमुक्तच्या या सोहळ्यास शुभेच्छा व्यक्त करून संस्थेच्या कार्याचा गौरवही केला. समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यातून थोडा वेळ काढून “व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा” या संकल्पनेचे मार्गदर्शन मनमुक्तच्या उपक्रमांतून होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
मनमुक्त फाऊंडेशनच्या संस्थापकांच्या संकल्पनेतून घडलेला हा सोहळा महाराष्ट्रातील स्त्रीशक्तीच्या गौरवाचा प्रेरणादायी ठरला असून, मूळ चंद्रपूर-मूलच्या मातीतील सुपुत्री देवयानी मैदमवार यांचा हा सन्मान स्थानिकांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
डॉ. पराग कालन यांनी अत्यंत खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालक केले. दिव्या भोसले यांनी त्यामध्ये आणखी रंगत आणली.सर्वच सन्मानार्थीनींनी आपल्या मनोगतात मनमुक्त फाऊंडेशन चे आभार मानले.
-----------------------------------------------------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!