पवनी येथे देश-विदेशातील २५०० गणेश मूर्तींचे भव्य प्रदर्शन
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवनी शहरात दिनांक. १ सप्टेंबर पासून देश-विदेशातील दुर्मिळ गणेश मूर्तींचे भव्य प्रदर्शन सुरू होत आहे. लक्ष्मी रमा सभागृहात १ ते ८ सप्टेंबर दरम्यान सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे.
येथील मूळ रहिवासी व मूर्ती संकलक विकास बिसने यांनी तब्बल २६ वर्षे सातत्याने हे संग्रहकार्य केले असून सध्या त्यांच्या संग्रहात ०.५ मिमी पासून ते २ फूट उंचीपर्यंतच्या सुमारे २५०० गणेश मूर्तींचा समावेश आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ, ब्राँझ, अस्थिदंत, काच, पेन्सिल, कापूस, साबण, सुपारी, हळद, बांबू, पेपर, नारळ अशा विविध धातू व वस्तूंमध्ये साकारलेल्या या मूर्ती पाहण्यासारख्या ठरणार आहेत.
बिसने यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९६ मध्ये नेपाळ दौऱ्यावर असताना विविध प्रकारच्या गणेश मूर्ती पाहून त्यांना संकलनाची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी भारतातील अनेक राज्यांतून तसेच इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, जपान आदी देशांतून गणेश मूर्ती संकलित केल्या.
प्रदर्शनातील मूर्ती फक्त कलात्मक आकर्षणापुरत्या मर्यादित नसून ‘मुलगा-मुलगी समान’, ‘हुंडाबळी नष्ट करा’, ‘शिक्षणाचे महत्त्व’, ‘कोरोना काळातील माणुसकी’ अशा सामाजिक संदेशांचाही प्रत्यय यातून येतो.
आजवर या प्रदर्शनाचे आयोजन पुणे, नागपूर, अमरावती, भंडारा, तुमसर, औरंगाबाद, रामटेक, कांद्री माईन्स तसेच मध्य प्रदेशातील बालाघाट येथे करण्यात आले आहे. त्यांच्या या अनोख्या संग्रहाला महाराष्ट्र टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डने गौरविण्यात आले आहे.
“तालुक्यातील भाविक व नागरिकांनी या भव्य प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन विकास बिसने यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!