पवनीच्या सुपुत्राचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : -  दि. १ सप्टेंबर २०२५ विदर्भातील वाढत्या सिकलसेल व थॅलेसिमिया या आजारांविषयी जनजागृतीसाठी थॅलेसिमिया व सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने नागपूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

गडकरींनी जनजागृती संदेश

कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “लग्नाआधी साधी रक्त तपासणी झाली, तर सिकलसेलग्रस्त बाळांचा जन्म रोखता येतो. समाजात या आजाराविषयी व्यापक जनजागृती घडविणे ही काळाची गरज आहे.”
त्यांनी या आजाराशी झुंज देणाऱ्या योद्ध्यांचा गौरव करत, त्यांच्या जिद्दीला खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरवले.

पवनीच्या सुपुत्राचा विशेष गौरव

या सोहळ्यात विविध क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात पवनी तालुक्याचा सुपुत्र डॉ. क्षितिज सूर्यवंशी यांचा केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या शुभहस्ते सन्मान झाला.

डॉ. क्षितिज सूर्यवंशी यांनी पवनी तालुक्यातील आसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत असताना ग्रामीण आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कोविड-१९ च्या भीषण काळात त्यांनी जीव धोक्यात घालून सेवा बजावली.

त्यानंतर त्यांनी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर येथून एम.डी. आयुर्वेद पदव्युत्तर पदवी मिळवली असून, नुकतेच ते मध्य प्रदेशातील आयुर्वेद महाविद्यालयात असिस्टंट प्राध्यापक म्हणून रुजू झाले आहेत.

स्व. प्रा. प्रेमचंद्र सूर्यवंशी व प्रा. डॉ. उषाकिरण सूर्यवंशी यांचे सुपुत्र असलेले डॉ. क्षितिज सूर्यवंशी हे स्वतः सिकलसेल आजाराशी लढा देत असूनही चिकाटी, जिद्द व परिश्रमाच्या जोरावर व्यावसायिक आयुष्यात उत्तुंग यश प्राप्त केले आहे.

 प्रेरणादायी योद्ध्यांचा गौरव

या कार्यक्रमात डॉ. सूर्यवंशी यांच्यासह ललित गजानन, वैभव ठोसर, स्मृती चौधरी, तितिक्षा उमाले, नझीर अहमद, मेहक, गिरीश डोंगरे, ईश्चिता शंकरकर, सायमा वास्कर, सिद्धार्थ चव्हाडे, जाग्रता चौधरी, संजलीनी सातपुते, पंकज रूघवानी, संगीता रूघवानी, दीपांशु रूघवानी आणि कमलजीत कौर या योद्ध्यांचाही सन्मान करण्यात आला.

शैक्षणिक, सामाजिक तसेच वैयक्तिक आयुष्यातील त्यांच्या जिद्दीमुळे ते समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांच्या कार्यातून सकारात्मकता आणि धैर्याचे उदाहरण निर्माण झाले आहे.या सन्मान सोहळ्याला भाजपा शहराध्यक्ष प्रवीण दादे, आमदार कृष्णा खोपडे, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विकी रूघवानी, बाल आयुष फाउंडेशनचे संचालक ललित परमार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

पवनीचा गौरव डॉ. क्षितिज सूर्यवंशी यांचा झालेला सन्मान हा केवळ वैयक्तिक नाही, तर संपूर्ण पवनी तालुक्याच्या प्रतिष्ठेचा क्षण ठरला आहे. त्यांच्या कार्यातून ग्रामीण भागातील तरुणाईला सेवाभाव, परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर उभ्या राहणाऱ्या यशाची प्रेरणा मिळेल, हे निश्चित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!