सावली तालुक्यात २१११ शेतकऱ्यांनी काढला पीक विमा - विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पाठ
सावली - तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे. यावर्षी ८ जुलै पर्यंत केवळ २ हजार १११ शेतकऱ्यांनी १४५६.३४ हेक्टर शेत पिकाचाच पीक विमा उतरविला आहे. पीक विमा काढणारे कर्जदार शेतकरी ६४२ तर बिगर कर्जदार शेतकरी १४६९ आहेत. शेतकऱ्यांना विम्याचा लाभ होत नसल्याने व विमा रक्कम स्वतः भरावी लागत असल्याने शेतकरी विमा काढण्याकडे पाठ फिरवीत असल्याचे चित्र आहे.
सावली तालुक्यात मुख्यपीक धानशेती आहे. तालुक्यात असोलामेंढा व गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे सिंचनाची चांगली व्यवस्था आहे. कोरडा दुष्काळ कमी पडतो मात्र अनेकदा वैनगंगा नदीला येत असलेला पूर व अवकाळी पावसामुळे पीकांची नुकसान होत असते. मात्र बोटावर मोजता येईल एवढ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला. म्हणूनच शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली असावी, असे बोलले जात आहे.
पीक विमा न काढण्याची कारणे
सरकारने एक रुपयात पीक विमा सुरु केल्यामुळे विमा काढण्याची सवय मोडली, पीक विम्याच्या रकमेत वाढ करून विम्याचा हप्ता हेक्टरी १,२२० रुपये केला आहे. कागदपत्रासाठी दोन तीनशे रुपयांचा खर्च, अनेक शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी (अॅग्रीस्टॅग) नाही. दरवर्षी शेतीचा विमा काढूनही कधीच भरपाई मिळाली नाही. मग कशाला काढायचा पीक विमा अशी धारणा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!