डोकावणं

डोकावणं... एका सवयीचं वरदान


"डोकावणं" हा काहीसा त्रासदायक शब्द. कोणत्याही व्यक्तीला आपल्या आयुष्यात दुसऱ्यांनी डोकावणं अजिबात आवडत नाही. हेच कारण आहे की जर कुणी डोकावण्याचा प्रयत्न केला, तर समोरच्याचा पारा चढतो, नापसंती व्यक्त होते, आणि कधी कधी पाणउतारही होतो.

पण एक सत्य आहे—डोकावणं सवय म्हणून वाईट असली, तरी माझ्या बाबतीत तीच सवय वरदान ठरली!

होय, हीच ती डोकावण्याची हौस, ज्यामुळे मी पत्रकार झालो. आणि पुढे याच पत्रकारितेच्या वाटेवरून माझी मास्तरकीही आकाराला आली.

लहानपणीच्या गोष्टी आहेत. आजसारखी डिजिटल माध्यमं नव्हती. जे काही वाचनाचं माध्यम होतं, ते फक्त छापील वर्तमानपत्र. आमचं मूल शहर छोटंसं. विजय महावादीवार आणि गंगाधर गंजीवार यांच्याकडे तेव्हा वर्तमानपत्रांची एजन्सी होती. घरी पेपर घेण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे एखाद्या पान ठेल्यावर जाऊनच वर्तमानपत्र वाचावं लागायचं.

घरासमोर जिथे आता नाग विदर्भ संघाचं दुकान आहे, तिथेच सुरेश सिरसकर यांचा पान ठेला होता. सकाळी शाळेला निघताना, दहा-साडेदहाच्या सुमारास पेपर तिथे पोहचायचे. मग काय? माझी पावलं आपसूकच त्या पानठेल्याकडे वळायची. पेपर वाचायची तल्लफ इतकी की, त्या गर्दीत, ज्येष्ठ मंडळींच्या खांद्याआड, त्यांच्या काखेखालून मी डोकावून बातम्या वाचण्याचा प्रयत्न करत असे.

माझ्या पाठीवर दप्तर असायचं, चेहऱ्यावर कुतूहल. हे पाहून काही सज्जन माझ्या हातात एखादं पान देत. बातम्या वाचण्याचा हव्यास वाढत गेला. कोणत्या ठेल्यावर कोणता पेपर येतो, हे मला पाठ झालं. आणि हे सर्व पेपर मी शाळा सुरु होण्याआधी डोकावून, कुठूनतरी वाचून संपवायचो.

पुढे हीच सवय वाचनातून लेखनात बदलली. सातवीत होतो तेव्हा स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीत "अभ्यासमालिका"तून विचारलेले काही प्रश्न "लोकमत"मध्ये प्रकाशित झाले. खरंतर प्रश्न सुटावेत म्हणून मी लिहिलं नव्हतं—माझं नाव वर्तमानपत्रात यावं, हा खरा हेतू होता!

तिथूनच संपादकीय पत्रं, लहानशा बातम्या, शाळेतील उपक्रमांची वर्णनं यांची सुरुवात झाली. पत्रकारितेची बीजं रोवली गेली आणि आयुष्याची दिशा ठरली.

आज मी जो काही आहे—शिक्षक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता—त्यामागे हे डोकावणं आहे. हीच सवय होती, जी वेळीच योग्य दिशेने वळवली गेली.

म्हणूनच मला वाटतं, काही सवयी वाईट असतातच असं नाही, त्या योग्य वेळी, योग्य रस्त्याला लागल्या, तर त्या जीवनाच्या दिशा बदलून टाकू शकतात.
---
- विजय प्रभाकर सिद्धावार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!