कार - दुचाकी अपघातातील अपंग युवक भटकतोय न्यायासाठी - पोलीस अधिक्षक कार्यालयातून तक्रारच गायब @ आमदार वडेट्टीवारांच्या तक्रारीवर होतेय हवालदाराकडून चौकशी
कार - दुचाकी अपघातातील अपंग युवक भटकतोय न्यायासाठी - पोलीस अधिक्षक कार्यालयातून तक्रारच गायब
@ आमदार वडेट्टीवारांच्या तक्रारीवर होतेय हवालदाराकडून चौकशी
सावली - सावलीवरून खेडीला दुचाकीने येणाऱ्या युवकांवर कारने जबर धडक दिल्याने दुचाकीचालक गंभीर जखमी झाले. मात्र सावली पोलिसांनी कार चालकावर कारवाई करण्याचे सोडुन गंभीर जखमी असलेल्या दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केल्याने सावली पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे. याबाबत न्याय मिळावा यासाठी १७ फरवरीला नितेश येनुगवार याने पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांना भेटून चौकशीची मागणी केली मात्र ती तक्रारच पोलीस अधिक्षक कार्यालयातून माहिती अधिकारात उघड झाली आहे. त्यानंतर आमदार विजय वडेट्टीवार यांनी याबाबत चौकशीचे पत्र दिले असता सावली ठाण्यातील हवालदाराकडून चौकशी केल्याने चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस किती सजग आहेत या प्रकरणावरून दिसून आले आहे.
३० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्रौ ९ वाजताचे दरम्यान नितेश येनुगवार व बंडू म्यानावार हे सावली वरून खेडीला आपल्या दुचाकीने जात होते. त्यावेळेस बोरकर यांचे गोडाऊन जवळ मागून येणारी गणेश सुधाकर बोम्मावार चालवत असलेल्या कारने दुचाकीस जबरदस्त धडक दिली. त्यात दुचाकी चालक नितेशच्या पायाला, डोळ्याला तर मागे बसलेल्या बंडूच्या पायाला गंभीर जखम झाली. भरधाव वेगाने असलेल्या कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून रोडच्या कडेला कार गेली. दुचाकीवर असलेल्या दोन्ही जखमीना सावली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन्ही जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रेफर केले. मात्र त्या दरम्यान कारचालकाला दवाखान्यात भरती करण्याची गरज पडली नाही. नितेश येनुगवार याला इतकी दुखापत झाली की त्याचा डावा पाय कापावा लागला. सावली पोलिसांनी घटनेच्या रात्री कारचालक गणेश बोमावार याची फिर्याद घेऊन दुचाकी चालकावर भा.न्या.स.२८१, १२५(अ) १२५(ब) मो. वा. अ. १८४, १२२, १७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाहनाच्या अपघातात मोठ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल होतो मात्र सदर प्रकरणात सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलूरवार यांनी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केल्याने कायद्याचे जानकार आश्चर्य व्यक्त करीत आहेत. सदर प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईवर संशय व्यक्त केल्या जात असून दुचाकी चालकावर गुन्हा दाखल तसा कार चालकावर का दाखल केला नाही? कार चालक अती भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याने कार नियंत्रणात आली नाही यावरून कार चालक आरोपी नाही का? पोलिसांनी दुचाकी रस्त्याचे मधोमध चालवीत असल्याने आरोपी बनविले तर रस्त्याचे मधोमध जाणाऱ्यास कुचलण्याचा अधिकार कारचालकास दिला आहे का? अपघाताचेवेळी कारचालक दारूच्या नशेत असल्याचे अनेकांचे म्हणणे असतांना पोलिसांच्या लक्षात आले नाही का? असे अनेक प्रश्न पोलिसांचे तपासावर निर्माण होत आहे. कारचालक हा सरकारी नोकरीवर असल्याने त्याला या प्रकरणातून वाचविण्यासाठी "चोर सोडून सन्यासाला फासी" देण्याचा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे.
नितेशची तक्रारच पोलीस अधिक्षक कार्यालयातून गायब
सदर प्रकरणाची तक्रार पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचेकडे १७ फरवरी ला नितेश येनुगवार यांनी प्रत्यक्ष भेटून केली होती व तक्रारीची प्रत आवक विभागात देऊन पोच घेतली. या प्रकरणात काहीच हालचाल होत नसल्याने माजी सभापती विजय कोरेवार यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात २१ एप्रिलला माहिती अधिकाराचा वापर करून प्रकरणाची माहिती मागितली मात्र ही तक्रारच अभिलेखात उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळाले. यावरून जिल्हा पोलीस विभाग किती गांभीर्याने प्रकरण हाताळते हे दिसून आले आहे.
आमदार वडेट्टीवार यांच्या लेखी तक्रारीवर हवालदाराकडून चौकशी
सावली पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केल्याने फेर चौकशी करण्याचे पत्र ९ जून २०२५ ला विधिमंडळ गटनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पोलीस अधीक्षकाकडे केली. आमदारांच्या पत्राची दखल घेऊन स्वतः अधिक्षक किंवा कार्यालयातील प्रमुखांकडून चौकशी व्हायला पाहिजे परंतु त्यांच्या पत्राला पोलीस स्टेशन सावली येथे फॉरवर्ड केले. या पत्रावर एका हवालदाराने नितेश येनुगवार याचेवरच दोष दाखवून तक्रारच निकाली काढण्याचा अफलातून सूचनापत्र दिला आहे. पोलीस स्टेशन विरुद्धची तक्रार त्याच पोलीस स्टेशनला फॉरवर्ड करण्याचा अफलातून प्रकार पोलीस अधिक्षक यांनी केल्याचे दिसून येते.
अपंग युवकास मारावे लागतात कोर्टात चकरा
सावली पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केल्याने सावली कोर्टात चकरा माराव्या लागत आहेत. घरची परिस्थिती बेताची. त्यात लहान मुलगी व पत्नी यांचे पालनपोषण व त्यात कोर्टाचा खर्च यामुळे या युवकाची निराशा होत असतांना पोलीस प्रशासनाकडून नितेश न्यायाची अपेक्षा ठेऊन आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!