"पाटी" एक हळवी आठवण!
"पाटी"
(एक हळवी आठवण)
अडगळीतून काहीतरी शोधत होतो, पण जे मिळालं त्याने मन पार वेगळ्याच वाटेवर निघालं. एका कोपऱ्यात पडलेली काळपट लाकडाची फ्रेम असलेली ती पाटी...! क्षणभर नजर स्थिरावली. हृदय थरारलं. नकळत डोळ्याच्या कडा ओलावल्या. ही तीच का? कोऱ्या मनावर ज्ञान आणि संस्कार रूजविणारी पाटी?, चविष्ट पेन्सिलींच्या चवदार आठवणींची साक्षीदार?
पाटी…!
माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातली ती पहिली साथीदार. आई-वडिलांच्या कष्टाच्या पैशातून, पण माझ्या स्वप्नांच्या लिखाणासाठी हातात आलेली. मार्कंडाच्या यात्रेत हट्ट केला, आई-दादांनी मना विरुद्ध ती घेतली (कदाचित ती पाटी घेऊन देण्या इतपत त्यांच्याकडे पैसे नसावेत). माझं आयुष्य घडवणारी ती काळीशी, पण भाग्य उजळवणारी!
दुसऱ्या वर्गातच ती पाटी मधोमध फुटली, या पाटीला कसा तडा गेला माहिती नाही, मात्र चौथीपर्यंत ती एकच तडा गेलेली पाटी होती. पण जशी फुटलेल्या मोत्यातून सुगंध पसरतो, तशीच तिच्या तडा गेलेल्या अंगातून माझ्या आयुष्यात नवे रंग उमटू लागले. वाक्यातले अर्धे शब्द एका बाजूला अर्धे शब्द दुसऱ्या बाजूला. हाताने ऍडजेस्ट करून पूर्ण वाक्य गुरुजींना दाखविण्यात कसरत करावी लागे. त्यातही काही शब्द पुसले जाणार नाही याची जास्त काळजी असायची.
वर्गात साऱ्याकडेच पाटी असायची. कुणाची फ्रेम निघालेला काळ्या टीनाचा चौकोन तुकडा, कुणाची तुटकी, अर्धी पाटी, कुणाची सुशोभित केलेली, कुणाच्या पाटीचा रंग गेलेली गंज लागलेली.. मात्र शिकण्याची जिद्द सर्वांची समान!
त्या काळी वर्ग एक ते चारपर्यंत सर्वकाही पाटीवरच लिहायचं. पाटी हेच नशीब होतं. हातात पेन्सिल, समोर काळी पाटी. त्यावर रेषा ओढून ‘अ आ’, ‘क ख’ गिरवायचं, मग पाढे, अंक, उभ्या रेषा ओढून त्या चौकोन डब्यात कधी एक ते शंभर तर कधी "बे" चे पाढे अंकलीपीतून गिरवायचे. – शिक्षणाचा प्रारंभ होताच तो पाटीवरून.
चुका झाल्या की तोंडात बोट, थुंकीचा वापर करून खोडायचं – तीच आपली पहिली "व्हाइटनर"! श्रीमंत मुलं बाटलीत पाणी आणायची, त्याने स्पंज फिरवून स्वच्छ पाटी तयार करत, राखी पौर्णिमेच्या राख्यामधील रंगबिरंगी स्पंज त्याकाळी पाटी पुसण्याचे चांगले अवजार होते. कधी एखाद्या कपड्याने, तर कधी शर्टाचा कोपरा तोंडात टाकून त्या भिजलेल्या शर्टाने पाटी साफ करत धडे गिरवत राहायचो.
पाट्यांचे प्रकारही रंगीबेरंगी होते. कुणाकडे मातीची, कुणाकडे दगडाची, कुणाकडे टिनाची, तर कुणाकडे हार्डबोर्डवर काळा लेप असलेली पाटी. काहींच्या पाट्यांना मणी लावलेले असायचे, आणि त्याचा मला नेहमी हेवाच वाटायचा.
या पाठी सोबतच आठवणीचा ठेवा म्हणजे पेन्सिल!
छोट्या छोट्या सहा इंचाच्या पेन्सिली… दहा-पाच पैशांत मिळणाऱ्या त्या चवदार पेन्सिली… भिंतीवर घासून टोकदार केलेल्या, अर्ध्या लिहिण्याच्या, अर्ध्या खाण्याच्या! लघवीच्या सुट्टीत तर अनेक मुलं लघवी करत करतच पेन्सिलला टोक आणायचे. पेन्सिल घासून घासून भिंती अगदी सफेदी मारल्यासारख्या दिसायच्या.
रस्त्यावर पडलेल्या पेन्सिली उचलायला लाज वाटायची नाही – उलट त्यातही सोन आनंद वाटायचा.
त्या काळी आम्हाला चॉकलेट लागत नसे, आमची चॉकलेट म्हणजे हीच पेन्सिल होती!
चौथीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दिवशी, बांबूच्या चूरकीत (टोपलीत) मातीची फळे भरून, ती पाटीवर ठेवून, फळाची परीक्षा दिली. त्यानंतर या पाटीशी माझे ऋणानुबंध तुटले. अडगळीत गेलेल्या या पाटी-पेन्सिलने मात्र माझे जेवण उजळविले
आज तीच अडगळ पुन्हा उघडली गेली… आणि त्यातली ती पाटी पुन्हा बोलू लागली.
ती पाटी आज माझ्यासमोर आहे. काळाने तिच्या अंगावर अनेक ओरखडे उमटवले आहेत. पण त्या प्रत्येक ओरखड्यामागे माझ्या आयुष्याची एक ओळ दडलेली आहे – संघर्षाची, जिद्दीची, आणि प्रेमाची.
कदाचित ती पाटी नसती तर आज मी नसतो.
आजही मी लिहितोय – फरक इतकाच की, आता हातात की-बोर्ड आहे आणि समोर स्क्रीन… पण हाताखालची ती चवदार पेन्सिल, आणि समोरची काळीशी पाटी मात्र मनातल्या एका कोपऱ्यात अजूनही कोरीच आहे – नव्या स्वप्नांसाठी, नव्या आठवणींसाठी
त्या फुटक्या दगडाच्या पाटीवरच लिहिलेल्या होते माझे पहिले स्वप्न, पहिले शब्द, पहिले आकडे. तिनेच माझ्या भविष्याचा पाया घातला. ती गेली, पण तिच्यावर कोरलेल्या आठवणी मात्र हृदयात कोरलेल्या आहेत. ती केवळ एक शैक्षणिक साधन नव्हती; ती होती माझ्या बालपणाचा मूक साक्षीदार, माझ्या निष्कलंक आनंदाची स्थळभूमी. पाटी गेली, पण तिच्यातून वाहणारा अनुभवांचा ओघ माझ्या ओठांवर एक मधुर, क्षणभरचा हसू आणून जातो... आणि डोळ्यांना पुन्हा एकदा ओलावा देऊन जातो.
विजय सिद्धावार
9422910167
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!