राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या सन्मानासाठी संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.२१/०४/२०२४ राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा ठसा उमटवलेल्या शिक्षकांच्या सन्मानासाठी राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेने आज जिल्हा परिषद,भंडारा येथे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद साळवे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.निवेदनात प्रामुख्याने दोन मागण्यांचा समावेश आहे. पहिली मागणी म्हणजे, पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अधिकृत ओळखपत्र प्रदान करण्यात यावे.हे ओळखपत्र त्यांना विविध शासकीय आणि प्रशासकीय कामांमध्ये उपयुक्त ठरू शकेल, तसेच त्यांचा सन्मान जपण्यास मदत करेल, असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.दुसरी महत्त्वाची मागणी जिल्हा परिषद स्वागत कक्षामध्ये पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या नावांचा सन्मान फलक (बोर्ड) लावण्यासंबंधी आहे. या मागणीद्वारे,जिल्हा परिषदेत येणाऱ्या अभ्यागतांना या कर्तृत्ववान शिक्षकांची माहिती मिळेल आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला जाईल,अशी भावना संघटनेने व्यक्त केली आहे.शिक्षकांच्या योगदानाला समाजात योग्य स्थान मिळावे आणि त्यांचा यथोचित सन्मान व्हावा, या उद्देशाने संघटनेने हे निवेदन सादर केले.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असून लवकरच यावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे,अशी माहिती संघटनेच्या सूत्रांनी दिली.
या निवेदनामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या अपेक्षांची दखल घेतली जाईल,अशी आशा व्यक्त होत आहे.
निवेदन देतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गायधने तथा पदाधिकारी दशरथ जिभकाटे, मनोहर पारधी,बाळासाहेब मुंडे, अशोक गिरी आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!