जिबगावचा शाश्वत विकासाकडे प्रवास: जंगल हक्कांपासून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात वसलेल्या जिबगाव या वनहक्क गावाने सामूहिक वन हक्कांची जाणीव होताच आपल्या गावाची दिशा बदलून टाकली आहे. २०१७ मध्ये वनाधिकार कायद्यानुसार (FRA) मिळालेल्या १२४.४९ हेक्टर सामुहिक वनक्षेत्राचा (CFR) वापर करत ग्रामसभेने पर्यावरण संवर्धन, रोजगार निर्मिती आणि शाश्वत उपजीविकेचा आदर्श निर्माण केला आहे.
सामूहिक वनहक्क मिळाला पण मार्गदर्शनाच्या अभावामुळे हे क्षेत्र निष्क्रिय राहिले होते. मात्र २०२२ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) च्या ‘पोस्ट-CFR फील्ड अॅक्शन प्रकल्पा’ अंतर्गत गावाने नव्या दिशेने वाटचाल सुरू केली. TISS च्या मदतीने ग्रामसभेने सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CFRMC) स्थापन करून बँक खाते उघडले,प्रशासनाच्या सहकार्याने वनहक्क क्षेत्राचे सीमांकन केले आणि पुढील पाच वर्षांचा व्यवस्थापन आराखडा तयार केला.
३० नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णय नुसार मनरेगांतर्गत पोर्टल वर (MGNREGA) ग्राम सभेची नोंदणी PIA (नियोजन व अंमलबजावणी संस्था) म्हणून केली आणि CFR क्षेत्रात ५,००० पेक्षा अधिक फळझाडांची लागवड केली. या बागेने गावातील अनेक कुटुंबांना रोजगार दिला आणि भविष्यातील आर्थिक उत्पन्नाचा मजबूत पाया घातला.
पाण्याच्या टंचाईची अडचण ‘श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजने’च्या सहकार्याने सोडवण्यात आली. गावाने बोअरवेलसाठी यशस्वी प्रस्ताव सादर केला आणि आता वर्षभर झाडांना पाणी पुरवठा शक्य झाला आहे.
सध्या ग्रामसभा १० ते १५ हेक्टरवरील बाग विस्तारण्याचा आराखडा तयार करत असून, गावातच ग्रामपंचायत वतीने १०,००० रोपांची नर्सरी तयार करत असून भविष्यातील लागवडीसाठी स्वयंपूर्णता साधणार आहे.
“टाटा सामाजिक संस्थेच्या ने आम्हाला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. जागरूकतेपासून ते अंमलबजावणीपर्यंत त्यांनी दिलेले मार्गदर्शन आमच्यासाठी फारच मोलाचे ठरत आहे." श्री.पुरुषोत्तम चुधरी सरपंच जिबगाव
जिबगावचे हे यश फक्त एका गावाची प्रगती नसून सामूहिक वनहक्क क्षेत्राचे व्यवस्थापनाची योग्य व प्रभावी अंमलबजावणी केल्यास ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक रोजगार या त्रिसूत्री ने गावाचा विकास होतोच. हे चित्र रेखाटणारी जिबगाव ग्रामसभा व ग्रामपंचायत हे एक उत्तम उदाहरण आहे...... ✍️
लेखन नितीन ठाकरे
टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, चंद्रपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!