मेंढपाळ बांधवांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करा - धनगर समाज संघर्ष समितीची मागणी
सावली - चांदली बुज. येथील निलेश कोरेवार व मुल येथील मल्लाजी येगेवार या मेंढपाळ बांधवाचा नरभक्षक वाघाने जीव घेतला असून पुढे अशी घटना होऊ नये यासाठी नरभक्षक वाघास जेरबंद करा व मेंढपाळांचा जीव जाणार नाही यासाठी उपाययोजना करण्याची मागणी उपवनसंरक्षक यांचेकडे डॉ. तुषार मर्लावार यांचे नेतृत्वात करण्यात आली.
सावली- मुल तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असुन पारंपारीक व्यवसाय शेळया मेंढया पाळणे हे आहे. दिनांक 6 मार्च 2025 ला रात्री चिमढा येथील शेतात मेंढयांचा कळप घेऊन श्री. निलेश दुर्गाजी कोरेवार रा. चांदली बुज. हे मुक्कामी असतांना वाघाने हल्ला केला. वनविभागाचे टिमनी शोधाशोध केल्यानंतर मध्यरात्री 2 वाजता प्रेत सापडले. दिनांक 8 मार्च 2025 रोजी मुल शहराजवळ श्री. मल्लाजी येगेवार रा. मूल हे मेंढयांचा कळप घेऊन नातवासह मुक्कामी असतांना रात्रो वाघाने हल्ला केला. सकाळी काही अंतरावर प्रेताचे तुकडे सापडले. दोन्ही घटनेतील वाघ एकच असून सावली वनपरीक्षेत्र व चिचपल्ली वनपरीक्षेत्रात नरभक्षक वाघाचा वावर आहे. या घटनांमुळे परिसरातील मेंढपाळ, शेतकरी, गुराखी फार घाबरलेले आहेत व पारंपारीक व्यवसाय कसा करायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे नरभक्षक वाघास तात्काळ जेरबंद करा व मेंढपाळ बांधवांच्या संरक्षणासाठी सौर कुंपण जाळी वनविभागाने उपलब्ध करून द्यावी ही मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे नागपूर विभाग अध्यक्ष डॉ. तुषार मर्लावार यांचे नेतृत्वात उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सावली वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, चिचपल्ली वनपरीक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी माजी सभापती विजय कोरेवार, चांदलीचे सरपंच विठ्ठल येगावार, पोलीस पाटील चिंतामण बालमवार, राजू कंचावार, सोमेश्वर कंचावार, संजय मर्लावार, अनिल अमृतवार, गणेश कंचावार, विजय अन्नावार, रामदास मर्लावार, रामाजी कंचावार, अशोक कंचावार उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!