अषित प्राथमिक शाळा पवनी येथील विद्यार्थीनी नमोश्री बोदेले प्रशस्तीपत्राने सन्मानित
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.११/०३/२०२५ ला छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे द्वारा आयोजित तालुका व महानगरपालिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज निबंध स्पर्धा - २०२४ आयोजित करण्यात आली होती.या संस्थेने शाहू महाराजांच्या कार्याची सर्वांना ओळख व्हावी व त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनाची उन्नती करावी,यासाठी सारथी संस्थेमार्फत शालेय व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज तालुकास्तरीय व महानगरपालिका स्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सारथी ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून त्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक,उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सदर निबंध स्पर्धा आयोजित केली होती.प्राथमिक स्तर इ.३ ते ५, इ.६ ते ७, इ.८ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व तालुका स्तरावर घेण्यात आल्या. या स्पर्धेत अषित प्राथमिक शाळा पवनी येथील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी नमोश्री बोदेले हिला उत्तेजनार्थ म्हणून सारथी द्वारा राज्याचे शिक्षण आयुक्त, माजी मुख्य सचिव,सारथीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र शाळेला प्राप्त झाले.या यशाबद्दल महाराष्ट्र ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा सुजाता गजभिये यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन तिला सन्मानित करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राकेश बिसने,प्रयागराज भोयर,मुरलीधर जीवतोडे, राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी,नक्षीता खोब्रागडे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!