नकली गृहकर पावती, शिक्का वापरून ग्रामपंचायतची फसवणूक - कारवाई करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल

 

 सावली (विजय कोरेवार) - ग्रामपंचायत मधील कर्मचारी हे नकली पावती बुक वापरून गैरव्यवहार करण्याचा प्रकार अनेक वेळा घडलेला आहे. मात्र गावातीलच एक व्यक्ती नकली गृहकर पावती ग्रामपंचायतच्या शिक्यानिशी देत असल्याचा धक्कादायक प्रकार चकपिरंजी गावात घडलेला असून सरपंच व सचिव यांनी सावली पोलिसात तक्रार दिलेली आहे. मात्र अजूनपर्यंत काहीच कार्यवाही न झाल्याने पोलिसांचे कार्यशैलीवरही प्रश्न निर्माण होत आहे.

        चकपीरंजी येथील रुपेश दडमल  याचेकडे कोणतीही मालमत्ता नसतांना गृहकर पावती आढळली. मात्र  याबाबत उपसरपंच अरविंद भैसारे यांना  शंका आल्याने त्यांनी ग्रामपंचायत रेकॉर्डची तपासणी केली. सदर क्रमांकाची कुठलीही पावती दिली नसल्याचे दिसून आले. पावती धारक रुपेश दडमल याचे बयान घेतले असता लोकनाथ रायपुरे यांनी ही पावती दिल्याचे सांगितले. एखादा व्यक्ती ग्रामपंचायतचे नावाने पावती व शिक्का वापरून गैरव्यवहार करीत असल्याचे आढळल्याने कारवाईबाबत मासिक सभेत ठराव घेऊन सरपंच उषा गेडाम व सचिव खोब्रागडे यांनी  5 डिसेंबरला याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन सावली व गटविकास अधिकारी पंचायत समिती सावली यांचेकडे तक्रार दिली. नकली पावती वापरून शासनाची आर्थिक फसवणूक करणे हा गंभीर गुन्हा असताना सावली पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याने पोलिसांचे कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. लोकनाथ रायपुरे हा व्यक्ती अशा प्रकारचे गृहकर पावती वापरून मा. न्यायालयात जमानत घेत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत चौकशी केल्यास मा. न्यायालयाची दिशाभूल करीत फसवणूक करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर येऊ शकतो. त्यामुळे याबाबत पोलिसांनी चौकशी करून फौंजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत पदाधिकारी करीत आहेत.

हीच ती नकली गृहकर पावती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!