तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठी तंटे - कवठी गावात मतदानातून अध्यक्ष निवड
तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठी तंटे - कवठी गावात मतदानातून अध्यक्ष निवड
@ उपस्थितांपेक्षा मतदान अधिक झाल्याने पंचायत समितीकडे तक्रार दाखल
सावली (विजय कोरेवार ) - ‘शांततेतून समृद्धीकडे’ नेण्याचा मंत्र असणारी महात्मा गांधी तंटामुक्त समिती. मात्र तंटे सोडविण्यासाठी अध्यक्षाची निवड करतांना भांडणे करीत मतदानाने निवड झाली परंतु हे मतदान प्रक्रियाच चुकीची झाल्याची तक्रार पंचायत समितीकडे देऊन तंटे वाढण्याचा प्रकार कवठी गावात घडत आहे.
गावागावात भांड तंटे वाढत असल्याने लोकसहभागातून गावातच ही भांडणे मिटावीत या उद्देशाने 15 ऑगस्ट 2007 रोजी तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांनी ‘शांततेतून समृध्दीकडे’ असे ब्रीद वाक्य असलेल्या ‘महात्मा गांधी तंटामुक्त अभियान’ ला सुरवात केली. अनेक तंटे सुटायला लागले. गावाला पुरस्कारसुद्धा मिळाले.
सावली तालुक्यातील कवठी येथे मागील अनेक वर्षांपासून टिकाराम मशाखेत्री हे तंटामुक्ती अध्यक्ष राहिले. नवीन समिती निवडीसाठी पहिली ग्रामसभा सरपंच कांताताई बोरकुटे यांनी आयोजित केली मात्र कोरम पूर्ण न झाल्याने सभा तहकुब करण्यात आली. काही दिवसानंतर ही तहकुब सभा घेण्यात आली. या सभेत टिकाराम मशाखेत्री व वैभव झरकर यांची नावे सभेत सुचविण्यात आली मात्र निवड करतांना गोंधळ झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले व सभा रद्द करावी लागली. त्यानंतर हीच सभा पोलिसांचे उपस्थितीत तिसऱ्यांदा घेण्यात आली. यात ग्रामसभेत उपस्थित असणाऱ्यांची हजेरी बुकात नोंद घेण्यात आली त्यात 104 लोकांची उपस्थिती दर्शविण्यात आली. मतदानाचे वेळी दोनशेच्या वर मतदान झाले. त्यात टिकाराम मशाखेत्री यांना मते जास्त पडल्याने निवड करण्यात आली. मात्र रजिस्टरवर उपस्थिती कमी असतांना जास्त मतदान कसे? असा आक्षेप घेत पंचायत समितीला तक्रार दाखल करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी काय निर्णय घेतात याकडे गाववासियांचे लक्ष आहे. मात्र तंटा सोडविण्यासाठी स्थापन करणाऱ्या समितीच्या निवडीसाठी तंटे होत असल्याने आश्चर्य होत आहे.
%20(2).jpeg)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!