डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे 'केटली'त कुणाचा चहा?

डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे 'केटली'त कुणाचा चहा?

मूल (प्रतिनिधी)

बल्हारपूर मतदार संघात 2019 प्रमाणे तिहेरी लढत आहे. 2019 मध्ये कॉंग्रेसने ओबीसी नेते, तेली समाजातील व्यक्तीमत्व डॉ. विश्वास झाडे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळचे बीआरएसपीचे बल्हारपूरचे नेते राजु झोडे यांनी, आपल्या बीआरएसपीचे खासदारकीचे उमेदवार दशरथ मडावी यांचे बाजूने न रहाता तत्कालीन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना समर्थन दिले होते.  मात्र बाळूभाऊनी शब्द देवूनही त्यांना कॉंग्रेसची उमेदवारी न दिल्यांने, राजू झोडे यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा घेत 39958 मते घेवून आपले अस्तित्व सिध्द केले होते. बल्हारपूर विधानसभेत  2019 ची पुनरावृत्ती 2024 मधील निवडणूकीत दिसत आहे. 

2024 मध्ये कॉंग्रेसने ओबीसी चेहरा दिला नाही. कॉंग्रेस खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांना साथ देणार्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांना बल्हारपुर विधानसभेसाठी शब्द दिला होता.  त्यांचे उपस्थितीतच डॉ. गावतुरे यांचा मुंबईत कॉंग्रेस पक्ष प्रवेश झाला.  मात्र राजु झोडे प्रमाणेच कॉंग्रेसने डॉ. अभिलाषा गावतुरे यांना उमेदवारी न देता, कॉंग्रेसचे निष्ठावंत नेते संतोष रावत यांचेवर विश्वास टाकला.

राजू झोडे यांनी कॉंग्रेसची उमेदवारी न मिळाल्यांने, ते शांत न बसता, रिंगणात राहीले, लढत तिहेरी झाली. लढतीत सुधीर मुनगंटीवार सहज निघाले. 

2024 च्या विधानसभेत 2019 ची पुनरावृत्ती दिसते.  या निवडणूकीतही तिहेरी लढत आहे.  तिहेरी लढतीचा फायदा कुणाला मिळेल, हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिष्याची गरज नाही. 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीचा राज्यात माहोल असताना, राजु झोडे हे चळवळीतील कार्यकर्ते, बहुजन समाज पार्टी, बहुजन रिपब्लीकन समाज पार्टी, कॉंग्रेसचे नेते आणि फुलेशाहूआंबेडकर चळवळीतील, दलितओबीसी चळवळीतील खंदे कार्यकर्ते म्हणून कार्य केले असतांनाही त्यांना 39958 मतांवर 'ब्रेक' लागला. मात्र त्यांनी केलेल्या मतविभाजनामुळे 33240 मताधिक्य घेवून सुधीर मुनगंटीवार विजयी झालेत. त्यानंतर, राजु झोडे यांचे उमेदवारीमागे सुधीर मुनगंटीवार यांची 'स्ट्रॅटेजी' असल्याची चर्चा झाली.

2024 मध्ये कॉंग्रेसने निष्ठावंत उमेदवार संतोष रावत यांचेवर विश्वास दाखविला. कॉंग्रेसची उमेदवारी मागणार्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी उमेदवारी कायम ठेवली. राजू झोडे यांचे प्रमाणे, त्या वंचित बहुजन आघाडी सारख्या राजकीय पक्षाकडून उमेदवार नसले तरी, राजू झोडे यांचेप्रमाणेच फुलेशाहूआंबेडकर चळवळीतील, दलितओबीसी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून स्वत:ची ओळख तयार केली आहे. राजू झोडे यांचेप्रमाणेच भाजपा विरोधात, कॉंग्रेसकडे जाणार्या मतदाराला ते साद घालीत आहेत. त्यांचा फायदा हा 'नेमका' कुणाला मिळेल हे दुधखुळा मुलगाही सांगू शकेल. 

राजू झोडेच्या उमेदवारी मागे मुनगंटीवार यांचे पाठबळ असल्याची चर्चा होती. आता डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या उमेदवारीला कुणाचा छुपा आशिर्वाद आहे? याची मतदारात चर्चा आहे.  डॉ. गावतुरे यांनी कॉंग्रसमधून बंडखोरी केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी साधा 'फोन'ही केला नाही.  किंवा अजूनपर्यंत त्यांचे पक्षातून निष्कासन केले नाही यावरून, त्यांचे उमेदवारीस कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आशिर्वाद असल्यांचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे, राज्यातील आणि जिल्हयातील सुधीर मुनगंटीवार विरोधी पक्षातंर्गत गट सक्रिय होवून, मुनगंटीवार यांचा 'एकनाथ खडसे' करण्यासाठी कामाला लागले असल्याची चर्चा आहे. हे कार्य पुर्णत्वास आणण्याकरीता डॉ. अभिलाषा गावतुरे या 'माध्यम' ठरत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  नागपूर येथील एका मंत्रीच्या उपस्थितीत बैठक होवून, तिथून त्या 'चिमूर' येथे गेल्या आणि त्यानंतरच प्रचाराला वेग आल्याची एक बातमी एका व्हिडीओ चॅनलवर 'अभिलाषा गावतुरे यांचे चिमूर कनेक्शन काय?' या शिर्षकाखाली युटयूबवर प्रकाशीत झाली.  चिमूरचे आमदार बंटी भांगडीया यांचा सुधीर मुनगंटीवार यांचा पक्षाअंतर्गत विरोध आहे, हे येथे महत्वाचे आहे. दुर्गापूर वेकोली कॉलनीत झालेल्या छटपुजा महोत्सवात अपक्ष उमेदवार अभिलाषा गावतुरे यांचा नारीशक्ती म्हणून सन्मान करण्यात आला.  या कार्यक्रमात माजी केंद्रिय गृहराज्यमंत्री हसंराज अहिर यांचे पुत्र रघुविर हसंराज अहीर, अहिर समर्थक माजी उपमहापौर अनिल फुलझेले प्रामुख्याने उपस्थित होते. हे केवळ​ निमीत्त होते की योगायोग?  यामुळेच मतदारात डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे उमेदवारीवरून चर्चेला उधाण असून, त्यांचे केटलीत चहा कुणाचा? हे 20 नोव्हेंबरच्या मतदानानंतरच कळेल.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!