मंडल मारतोय बंडल आणि पवार झालाय फरार... सावली तालुक्यात 'हर घर नलसे जल" योजनेचा बट्याबोळ..

 मंडल मारतोय बंडल आणि पवार झालाय फरार...

सावली तालुक्यात 'हर घर नलसे जल" योजनेचा बट्याबोळ..

सावली (विजय कोरेवार) -

 हर घर जल या पाणीपुरवठा जलजीवन मिशन योजनेचा सावली तालुक्यात बट्ट्याबोळ झालेला असून असित मंडल व पवार कंट्रक्शन या जोडीने जास्तीत जास्त काम घेऊन कामे अपूर्ण ठेवल्याने पाण्यासाठी भटकण्याची वेळ आणून ठेवलेली आहे तर शासनही कामासाठी निधी देत नसल्याने अधिकारी काम करून घेण्यास ग्रामीण पाणीपुरवठा विभाग हतबल ठरत आहेत.

      15 ऑगष्ट 2019 मध्ये लाल किल्यावरून देशाला संबोधीत करतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 'हर घर नलसे जल' या योजनेची घोषणा केली. 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरविला जाईल असे आश्वस्त करण्यात आले.

''मै आज लाल किले से घोषणा करता हूं कि आने वाले दिनों में हम जल जीवन मिशन को और आगे बढायेंगे । केंद्र और राज्य संयुक्त रूप से इस जल जीवन मिशन पर काम करेगी। हमने आने वाले वर्षों में इस मिशन पर 3.50 लाख करोड रूपये से अधिक खर्च करने का वादा किया है" ।

         जलजीवन योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 सप्टेंबर 2019 रोजी देशातील सर्वच सरपंच यांना पत्र पाठवून ही योजना सामाजीक स्वास्थाकरीता राबविण्याचे आवाहन केले. प्रत्येक व्यक्तीमागे 55 लिटर पाणी देता येईल असे​ नियोजन या योजनेत करावयाचे होते. लोकसंख्यानुसार तेवढ्या क्षमतेच्या पाणी टाकी (जलकुंभ) बांधकाम करावयाचे होते. देशभर या योजनेचा गवगवा झाला मात्र सावली तालुक्यात अजूनही 'हर घर नलसे जल' योजनेचा पाणी मिळालेला नाही.

         महाराष्ट्र शासनाने जलजीवन मिशन ही योजना सुरू केली त्यात प्रत्येक घरी नळ व शुद्ध पिण्याचे पाण्याची योजना आखली आहे. सावली तालुक्यात 55 कामे 50 कोटी रकमेची मंजूर आहेत. 55 पैकी बारा कामे पूर्ण झालेली असून 9 कामाची विद्युत व्यवस्था बाकी आहे तर 34 कामे अपूर्ण व्यवस्थित आहेत. या कामापैकी असित अधीर मंडल यांचेकडे 7 व पवार कंट्रक्शन कडे 13 कामे आहेत.

🚰 असित मंडल यांचेकडे असलेली कामे 

 खेडी, सायखेडा, नवेगाव तुकूम, बारसागड, मंगरमेंढा, दाबगाव, पांढरसराड. 

🚰पवार कंट्रक्शनकडे असलेली कामे 

चांदली बुज., उपरी, कापसी, सोनापूर, बोरमाळा, करोली, गायडोंगरी, जांब केरोडा, कसरगाव, विहीरगाव, करोली, उसरपार चक, कवठी. 

गावोगावी रस्ते खोदून ठेवल्याने रहदारीस अडथळे येत आहेत

        वरील कामे करण्यारे कंत्राटदार असित मंडल हे आज - उद्या काम सुरु करतो म्हणत बंडल मारत आहे तर पवार हे बाहेरील जिल्हातील कंत्राटदार असल्याने फोनही न घेता फरार झाल्याची चर्चा आहे. निधीची गरज असताना शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. निधीअभावी कंत्राटदार काम ठप्प ठेवलेले आहेत. मतांसाठी लाडक्या बहिणीकडे जास्त लक्ष  दिल्या जात असताना मात्र लाडक्या बहिणीचा पाण्याचा त्रास वाचवणाऱ्या योजनेकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने महिलांमध्ये शासनाप्रती रोष आहे. 

सदर जलजीवन मिशनची कामे अपूर्ण असल्याने कंत्राटदारांवर दिवसानुसार दंड सुरु केले आहे. फंड नसल्यामुळेही कामे ठप्प झालेली आहेत. लवकर काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे.

कुणाल येनगंदेवार 

उप अभियंता 

ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग सावली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!