धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे एक दिवस आधी बाबासाहेब कुठे होते माहित आहे काय?


Dr. Babasaheb Ambedkar

दिनांक 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूरात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा होतोय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर येथे लाखो अनुयायांना बौध्द धम्माची दिक्षा दिली. जीथे दिक्षा दिली, त्या दिक्षाभूमीवर आता दरवर्षी लाखो बौध्दप्रेमी श्रध्देने येत, भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेपुढे नतमस्तक होतात.
नागपूरात ऐतिहासीक धम्मचक्र प्रवर्तन झाल्यानंतर, चंद्रपूरात धम्मचक्र अनुप्रवर्तन झाले. या अनुवर्तन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे एक दिवस आधी बाबासाहेब कुठे होते? अनेकांना ठाऊक नाही, मात्र बाबासाहेब त्या दिवशी मूल गावात उपस्थित होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी दिनांक 15 ऑक्टोबर 1956 रोजी सकाळी 5 वाजता खाजगी मोटारीने नागपूर वरून उमरेड, भिवापूर, नागभीड, मूल मार्गे आणण्यात आले. येतांना प्रवासात बाबासाहेबांना त्रास झाला,  बाबासाहेब मूल येथील विश्रामगृहात थांबले. रस्त्यात कुठे न्याहारीची व्यवस्था नसल्यांने त्यांना भूकही लागली होती. तसे त्यांनी सोबत असलेले लक्ष्मणराव जुलमे यांना सांगीतले.  लक्ष्मणराव जुलमे यांना त्यांनी, इथे कुठे दलितांचे घर आहे काय? काही खायला मिळेल काय? याची चौकशी केली. लक्ष्मणराव जुलमे यांनी, विश्रामगृह शेजारीच असलेल्या पीसाबाई लिंगाजी गोवर्धन (मूलचे पत्रकार भोजराज गोवर्धन यांची आजी) यांचे घरी जावून, 'आज तुमचा फार सुंदर योग आला आहे, तुमच्या हातची भाकरी, भाजी एक बोध्दीसत्व ग्रहण करणार आहे. म्हणून लवकरात लवकर ज्वारीची भाकरी आणि असेल ती भाजी बनवा. हे ऐकूण पिसाबाईला खूप आनंद झाला. आणि क्षणाचाही विलंब न करता, ज्वारीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा लक्ष्मणराव जुलमेच्या हातात दिला.
मूल येथील आताही अस्तित्वात असलेल्या विश्रामगृहात त्यानी काही काळ विश्राम केला होता. मूल येथील विश्रामगृहात विश्राम केल्यानंतर ते सायंकाळी चंद्रपूरला अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी रवाना झाले होते. मूल शहरात त्यांचे पदस्पर्श झाल्याने, मूल शहराच्या दृष्टीने हा ऐतिहासीक आणि अभिमानाचा क्षण ठरला.
पिसाबाई गोवर्धनच्या हातची भाकरी, चटणीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेवण केले आणि दुसरे दिवशी चंद्रपूरात ऐतिहासीक धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाला आपल्या अनुयायाना धम्म दिक्षा दिली.
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पब्लिक पंचनामाकडून शुभेच्छा !
विजय सिध्दावार
लेखक
9422910167, 7588883477

२ टिप्पण्या:

झिंदाबाद!