वनविभागाकडे अर्ज करून डुकरांना मारा - मंत्री मुनगंटीवार मत्स्यमहोत्सवात शेतकऱ्यांना दिलासा
मत्स्यमहोत्सवात शेतकऱ्यांना दिलासा
सावली - पेंढरी येथे मच्छीमार व मत्स्यसंवर्धनसाठी मत्स्यमहोत्सव व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटक नाम. सुधीर मुनगंटीवार यांनी मच्छीमार समाज व मत्स्यव्यवसायासाठी भरीव मदतीचे आश्वासन दिले व या भागातील शेत पिकाचे रानटी डुकरांमुळे फार नुकसान होत असल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी यांची परवानगी घेऊन डुकरांना मारावे व शेतपिकाचे संरक्षण करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला.
सावली तालुक्यातील पेंढरी येथे निनाद गडमवार यांच्या एन. के. अक्वाकल्चर मत्स्यविज केंद्रात मत्स्यव्यवसाय विभाग व सांस्कृतिक विभाग यांचे वतीने मत्स्यमहोत्सव व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महोत्सवाचे उदघाटक वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय विभाग तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, माजी आमदार अतुल देशकर, आयोजक निनाद गडमवार यांचेसह मत्स्यविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मत्स्यव्यवसाय करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहणार, एमआयडीसीच्या धर्तीवर वनावर आधारीत एफआयडीसी स्थापन करणार, शेतपिकाचे नुकसान भरपाईत वाढ करणार, भरपाई एक महिन्याच्या आत न मिळाल्यास 10 टक्के व्याजासह भरपाई मिळण्याचा प्रस्ताव आणणार या आश्वासनासह वनक्षेत्र अधिकारी यांचेकडे अर्ज करून डुकरांना मारावे व आपणच विल्हेवाट लावावे असा शेतकऱ्यांना दिलासाधायक सल्ला दिला. आमदार विजय वडेट्टीवार यांनी मच्छीमार समाज बिकट अवस्थेत असल्यामुळे यांचे घरकुल प्रश्न सोडवावे व वाघांचा व डुकरांचा बंदोबस्त करावा ही मागणी केली. महोत्सवात गोंडी सांस्कृतिक नृत्य, लावणी सादर करण्यात आले. कार्यशाळेत मत्सव्यवसाय क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचे आदान प्रदान, तांत्रिक मार्गदर्शन, उपलब्ध संधीचा शोध, विविध शासकीय योजना, रोजगार निर्मिती तसेच बाजाराची उपलब्धता बाबत मत्स्यबीज उत्पादक, मत्स्यविक्रेते, मत्स्यव्यवसायिक, मत्स्य सहकारी संस्था यांना मार्गदर्शन करण्यात आले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!