महानुभाव हा परिपूर्ण व स्वतंत्र धर्म - डॉ.प्रविण बनसोड

महानुभाव हा परिपूर्ण व स्वतंत्र धर्म -  डॉ.प्रविण बनसोड

तलोधि( बा.):

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सामाजिक व आध्यात्मिक विचारांचा जागर करणारे सर्वज्ञ संस्कार त्रैमासिकाचा, महानुभाव धर्मातील पहिला 'अष्टशताब्दी विशेषांक' सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी अवतरण वर्षाच्या निमित्ताने    तळोधी (बा) ता.नागभिड जि.चंद्रपूर  येथे दि.१२/३/२०२३ ला 'प्रथम सुत्र निरुपण' दिनाच्या पर्वावर प्रकाशीत करण्यात आले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी १२ व्या शतकात महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवरील अमरावती जिल्ह्यातील सालबर्डी येथे आदिवासी बांधवांना निमित्त करून अहिंसेचा संदेश दिला. त्यावेळी त्यांनी 'एथ शरण आलेया काई मरण असे' हे मराठी भाषेतील प्रथम सुत्र निरुपण करून मराठीला देववाणी व धर्मभाषेचा दर्जा देऊन मराठी साहित्य व वाड्मय समृद्ध करण्याचा नवा दृष्टिकोन मांडला. त्यानिमित्ताने कै.प.पु.ई.श्री. राजधरदादा कारंजेकर सेवा समिती, 'सर्वज्ञ संस्कार त्रैमासिक' तळोधी (बा) द्वारा आयोजित प्रथम सुत्र निरुपण दिन, अष्टशताब्दी विशेषांक प्रकाशन, युवा प्रबोधन व्याख्यान व प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. 
           महानुभाव हा परिपूर्ण तत्वज्ञान असलेला स्वतंत्र धर्म असून, शासनाने महानुभाव धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देऊन महानुभावांची  जणगणना करावी या मागणीच्या चळवळीला  महानुभावांची क्रांतीभुमी असलेल्या तळोधी (बा) येथून प्रारंभ होत आहे असे विचार, सुप्रसिद्ध विचारवंत व 'मानवी स्वातंत्र्याचे उद्गाते सर्वज्ञ चक्रधर' या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक  प्रा.डॉ.प्रविण बनसोड,  ( प्राचार्य नेहरू महाविद्यालय, नेरपरसोपंत जि.यवतमाळ यांनी व्यक्त केले. युवा प्रबोधन व्याख्यान सत्रात 'महानुभावांची धर्मसंकल्पना व समतावाद' या विषयावर ते बोलत होते. प्रा.भारतभूषण शास्त्री, अंबड जि.जालना यांनीही या व्याख्यान सत्रात आपले विचार व्यक्त केले. या युवा प्रबोधन व्याख्यानाचे अध्यक्ष पु.ई.श्री.प्रा डॉ.केशिराजदादा कपाटे, नागपूर होते. 
    समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास केवळ शासनस्तरावर प्रयत्न करून साधल्या जाऊ शकत नाही त्यासाठी समाजातील पुढे आलेल्या लोकांनी स्वप्रेरणेने व क्षमतेनुसार समाजात मागे पडलेल्या लोकांना मदत करण्याकरिता Pay Back Tuesday  (पे बॅक ट्यूसडे) या नाविन्यपूर्ण उपक्रमांची सुरूवात संस्थेच्या वतीने  मा.साजनकुमार शेंडे, नागपूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देऊन करण्यात आली. या उपक्रमांतर्गत समाजातील  गरजूंना विविध माध्यमांतून मदत व सहकार्य करण्याचा संस्थेचा मानस आहे. 
          महानुभाव धर्मातील 'प्रभुप्रीत' या सुप्रसिद्ध एल्बमचे निर्माता परमार्गसेवक श्री प्रेमदासजी मेश्राम ( गितकार व कवी नागपूर) तसेच प.पु.प.म.श्री. ऐल्होव्यास बाबा दर्यापूरकर मुल जि.चंद्रपूर यांना  कै.प.पु.ई.श्री. राजधरदादा कारंजेकर प्रेरणा पुरस्कार २०२३ देऊन गौरविण्यात आले. 
  या संपूर्ण कार्यक्रमाला प.पु.प.म.श्री खंदारकर बाबा मनसर,  प.पु.प.श्री.विश्वनाथबाबा कपाटे मनसर, ॲड. भूपेश पाटील नागपूर, अनिल निमगडे ( जिल्हा क्रीडा अधिकारी वर्धा) डॉ. श्याम निमगडे (जिल्हा आरोग्य अधिकारी नागपूर)  
श्री.खोजरामजी मरस्कोल्हे, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री
विलास रामटेके, प्रास्ताविक निकेश अलोणे व आभार टि.पी.गणविर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.दिपक गणविर भोपाळ, तृषाल रामटेके, गुरुदेव मदनकर, प्रशांत रामटेके, मुकेश शेंडे, हंसराज खोब्रागडे, चांगदेव जनबंधू व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी (बा) व परिसर चे पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!