विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला तडजोडीचा मुलामा


कोसंबी येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रकरण
अवेळी येणाऱ्या, न शिकवणाऱ्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांचा रोष
गटशिक्षणाधिकारी यांनी दिली शाळेला भेट
विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यात समन्वय साधला - गटशिक्षणाधिकार
ब्रम्हपूरी (विनोद चौधरी )
शहर प्रतिनिधी ब्रम्हपुरी - कालचा दिवस चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात अविस्मरणीय असाच राहिला. विद्यार्थ्यांची शिकण्याची तीव्र इच्छा आणि तीच शिक्षणाकांक्षा पूर्ण होत नसल्याने कोसंबी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातल्या रस्त्यांनी फेरी काढून आंदोलन केले. आंदोलनाचा आवाज सर्वत्र पोहोचताच ब्रह्मपुरीचे गटशिक्षणाधिकारी यांनी आज शाळेला भेट दिली. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यात चर्चा घडवून समन्वय साधला अशी माहिती त्यांनी दिली.
         ब्रम्हपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसंबी येथील विद्यार्थ्यांनी काल गावातल्या रस्त्यांवर फेरीकडून आगळेवेगळे आंदोलन केले. शाळेतील शिक्षक वेळेवर येत नाही आणि वेळेवर न येता सुद्धा ते शिकवत नाही त्यामुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी गावातीलच रस्त्यांनी फेरी काढली. आणि फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांच्या मनात शिक्षकांप्रती असलेल्या रोषाला बाहेर काढले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर शिक्षकांबद्दलचे वक्तव्य केले. एकूणच या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना एकमेव बाब अपेक्षित होती ती म्हणजे आम्हाला शिक्षकांनी शिकवावे आणि शिक्षकांनी आमच्यावर सुसंस्कार करावेत.
          सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थ्यांचा हा आवाज सर्व दूर पसरला आणि शिक्षण विभाग खडबडून जागे झाले. ब्रम्हपुरीचे शिक्षणाधिकारी माणिक खुणे यांनी तात्काळ आज दुपारी कोसंबी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. या भेटीदरम्यान गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, सदस्य यांच्या समवेत बैठक बोलावली. त्या बैठकीत सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात झालेल्या प्रकाराबद्दल चर्चा घडवून आणली. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्वांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि त्यादरम्यान त्यांना हे लक्षात आले की, झालेला प्रकार हा विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यात समन्वय नसल्याने घडून आला. तसेच शिक्षकांमध्ये अंतर्गत वाद आहेत आणि त्या वादाच्या परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. ही बाब त्यांच्या लक्षात येतात त्यांनी सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये समन्वय साधून आणल्याचे त्यांनी सांगितले.
             गटशिक्षणाधिकारी यांनी बैठकीत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान एका शिक्षिकेला तुम्ही विद्यार्थ्यांना भडकविता असे म्हणून बाहेर निघा असे म्हटले. यावर त्या शिक्षिकेने माझे काही प्रश्न आहेत आणि मला त्या प्रश्नाचे उत्तर द्या असे म्हणून थांबल्या. त्या शिक्षिकेच्या काही प्रश्नांचे निराकरण बीईओ माणिक खुणे यांनी केले अशी माहिती आहे.
           कोसंबी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुळशीदास अंबाडोरे, सरपंच संगीता जेंगठे, पोलीस पाटील संजय गेडाम, कैलास राऊत यांच्याशी सदर प्रकाराबाबत चर्चा केली. शाळेमध्ये क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम होत नसल्याची खंत व्यक्त करीत विद्यार्थी, पालकांनी अतिरिक्त शिक्षकांची मागणी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!