यशवंतराव घरकुल योजना एकाच विधानसभा क्षेत्रात मंजूर - पालकमंत्री जिल्ह्याचे की एकाच क्षेत्राचे? नागरिकांचा संतप्त सवाल
महाराष्ट्र शासनाने भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या यादीस नुकतीच मंजुरी दिली असून या यादीत फक्त बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील लाभार्थी असल्याने इतर तालुक्यावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत की फक्त बल्लारपूर क्षेत्राचे आहेत असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना ही रमाई आवास योजना, शबरी आवास योजना या धर्तीवर भटक्या जमातीसाठी आहे. भटक्या जाती जमाती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाने 24 जानेवारी 2018 च्या शासकीय परिपत्रकानुसार यशवन्तराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुल देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ही योजना त्यावेळेस राबविण्यात आली नाही. नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने भटक्या जाती जमाती, इतर मागास बहुजन विकास विभागाच्या वतीने 8 फरवरी 2023 शासकीय परिपत्रकानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 2803 भटक्या जमातीतील कुटुंबाना घरकुल मंजूर झाले आहे. त्यात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल तालुक्यात 1904, पोंभुर्णा तालुक्यात 491, बलारपूर तालुक्यात 256 तर चंद्रपूर तालुक्यात 100 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून 2 कोटी रुपये निधी समाजकल्याण विभागाला देण्यात आली आहे. मात्र घरकुल मंजूर करीत असतांना जिल्ह्यातील इतर 11 तालुक्यात एकही लाभार्थी निवडले नसल्याने या निर्णयाविरोधात लोकभावना उमटत आहेत. या योजनेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना समान लाभ मिळाला पाहिजे परंतु चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इतर तालुक्यांना डावलत फक्त आपल्या विधानसभा क्षेत्रातील व चंद्रपूर तालुक्यात घरकुल योजनेचा लाभ दिलेला आहे. मंजूर यादीत भाजपचेच आमदार असलेले चिमुरचे आमदार बंटी भांगडिया यांच्याही क्षेत्रातील लाभार्थ्यांची नावे नाहीत, लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्याही क्षेत्रातील लाभार्थी नाही, मागील पाच वर्षात जिल्हा परिषदेत नेतृत्व करणारे अनेक माजी जीप सदस्य यांचेही क्षेत्रातील लाभार्थी नाही, घरकुल मंजूर होईल या आशेने यादी पाठविलेले भाजपचे सरपंच यांचेही गावातील लाभार्थी नाही.
ग्रामपंचायतीमधून यशवंतराव चव्हाण घरकुल, धनगर घरकुल, शबरी घरकुल योजनेची यादी मागविण्यात येते. मात्र मंजुरी देतांना फक्त आपल्या क्षेत्रातील, मर्जीतील लोकांना घरकुल देत असतील तर ग्रामपंचायतवर अन्याय आहे. घरकुल द्यायचे नसतील तर यादी मागण्याचे सोंग करू नये.
सतीश नंदगिरवार
उपाध्यक्ष
सरपंच परीषद चंद्रपूर जिल्हा
इतर तालुक्यातही फार मोठ्या प्रमाणात भटकी जमात असताना फक्त याच क्षेत्रात लाभ का दिल्या जात आहे? सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत की एका विधानसभा क्षेत्राचे आहेत? असा संतप्त सवाल जिल्ह्यातील नागरीक करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!