वात्सल्यसिंधु माझी आई

प्रथम पुण्यस्मरण

वात्सल्यसिंधु माझी आई


’स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’  असे म्हणतात ना ते खरेच आहे.आई म्हणजे दुधावरची साय. आई म्हणजे लंगडयाचा पाय. आई म्हणजे घरात गजबजलेले एक गाव. आई घरात  नाही, ही कल्पनाच मनाला अतिशय वेदनादायी ठरते. बाळ कसा ही का असेना, आई त्याचा आधार असते.आई म्हणजे जीव की प्राण.सदेव बाळाच्या हृदयात  साठवलेले एक हृदय स्पर्शी नाव.जी जगाच्या भवसागरात तारून नेऊ शकते. अशीच माझी आई.वात्सल्यसिंधु  आई. सिंधुताई ओमाजी रेकलवार. आज 10 ऑगस्ट 2022. आईचा प्रथम पुण्यस्मरण. आईने वर्षभरापूर्वी आम्हा चार  लेकरांना,नातवंडाना,सुनांना आणि असंख्य आप्तेष्टांना  सोडून जगाचा  निरोप घेतला. त्याला आज एक वर्षे पूर्ण होत आहे. आई विना एक वर्षाचा  कालावधी कसा पार झाला. हे कळलेच नाही. एक वर्षाचा कालावधी भुर्रकन उडून गेला. आईची आठवण सदैव येत राहीली.प्रत्येक कार्यक्रमात,प्रत्येक सणात आईची आठवण झाली नाही, तर गोष्टच वेगळी. आजही हा लेख प्रपंच लिहताना माझे डोळे पाणावले.हृदयात आठवणी दाटल्या. ओलावल्या डोळयांनीच हा लेख लिहताना पावसाच्या सरी जशा बरसाव्या तशा अश्रूच्या धारा मोळळया झाल्या. खरंच आई आज आमच्यात हवी होती.वर्षभरात घडलेल्या अनेक गोष्टींनी तिला नक्कीच आनंद झाला असता.माझी आई खरंच प्रेमळ होती.पण तेवढीच तिखटही होती.हृदयाने हळवी होती.पटकन बोलून मोकळी  व्हायची.मनात एक आणि ओठात एक असं कधीही तिच्या जवळ नसायचं.संगळयांवर उत्तम आणि चांगले संस्कार झाले पाहिजे.या विचारांची आई होती.तिने आमच्या भावंडावर केलेल्या उत्तम संस्कारामुळे आज आम्ही आमच्या क्षेत्रात भरारी घेत आहोत. केवळ आमच्यावरच नव्हेतर नातवंडावरही तिने उत्तम संस्कार केलेत.त्यामुळेच नातवंडांनी आईला आजी असे न संबोधता मुलची आई असेच संबोधले.खरंच मुलची आई आणि आम्हा मुलांची आई हे शब्द  किती गोड वाटतात.आम्ही आमच्या  वडिलांना दादा असे म्हणायचो.आणि नातवंडांनी सुदधा आमच्या वडिलांना नेहमी दादा असेच संबोधले आहे. आईचे भावंड अर्थात आमचे मामा आईला सिंधक्का म्हणून आवाज मारायचे.सर्व भावंडा मध्ये आई मोठी असल्याने आक्का म्हणून प्रसिदध होती. आई सुगरण होती.स्वयंपाक उत्तम बनवायची.गणपतीच्या दिवशी बनवलेला काला सर्वांना आवडायचा. चविष्ट काला परत परत मागावा असाच तो असायचा.हातावरच्या चकल्याची चव आजही जिभेवर रेंगाळल्याचा भास होतो. आई केवळ घर सांभाळण्यातच हुशार नव्हती,तर ती खेळांमध्येही हुशार होती.त्या काळातील मराठी पाठयपुस्तकातील कविता आईला या वयातही आठवायच्या.आईचे चौथी पर्यंतचे शिक्षण चामोर्शी येथे झाले.आईचे माहेर हे कोनसरी होते.आईसोबत आम्ही भावंड आजोबाच्या गावाला जात होतो.किती तरी आठवणी आज या निमित्ताने आठवतात.   आमचे दादा अर्थात वडिल ओमाजी पोशटटी रेकलवार यांचे वयाच्या 85 व्या वर्षी दिनांक 24-03-2018 रोजी निधन झाले.आईचे वयाच्या 79 व्या वर्षी दिनांक 10-08-2021 रोजी निधन झाले.वडिलांच्या निधना नंतर आई थोडीसी मनाने खचली. आपल्या मनातील सल तिने कधीही बोलून दाखविली नाही.दोघांची जोडी उत्तम होती. म्हणून दोघांनी या जगाचा निरोप घेतांना अठरा हा आकडा कायम ठेवला.हा केवळ एक योगायोगच म्हणावा लागेल. जानेवारी 2020 मध्ये आईचा अठयाहत्तरी अभिष्टचिंतन सोहळा  आणि धनश्रीचा पाचवा   वाढदिवस अतिउत्साहाने साजरा करण्यात आला होता. रामलीला भवनात झालेला हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. आई नऊवारी पातळ नेसायची.वाढदिवसानिमित्त खास नऊवारी पातळ घेण्यात आले होते.ते आईला खुपच आवडले होते. पातळ नेसल्यानंतर आईने एक आपल्या मनातील इच्छा  बोलून दाखविली होती.ती म्हणजे मी जेव्हा या जगाचा निरोप घेईन तेव्हा मात्र हेच नऊवारी पातळ माझया पार्थिवावर ठेवायचे. ही इच्छा पूर्ण करण्यात आली. आमचे वडील गांधी विचारांचे होते. शेवट पर्यंत त्यांनी खादीचे कपडेच परिधान केले. त्यांच्याही पार्थिवाला खादीचेच कपडे परिधान करण्यात आले होते. आज आईच्या आठवणी मनात भरपूर आहेत.अनेक आठवणी उंचबळून येतात. शेवटी माझयातली आई कधीच संपत नाही. आणि संपणारही नाही. आईचा मी लाडका होतो. लिहायला शब्दही अपूरे पडतात. माझी आई स्नेह, जिव्हाळा जपणारी होती.वेळप्रसंगी धाडसी सुदधा होती. नात्याला आणि कुटुंबाला घटट धरून ठेवणारी समई होती. एकप्रकारे नात्यांची घटट वीण होती. आईने अनेक दुख सहन केले.यातना भोगल्या.आईची आई अर्थात माझी आजी आई लहान असतानाच मरण पावली.तरीही आई खचली नाही.जिददीने,धैर्याने मोठी झाली.कुटुंबाला आणि सगेसोय-यांना जपली.तिचा आशीर्वाद आजही आमच्या पाठिशी सदैव रावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.आईच्या आठवणी सह आम्हा सर्वांची भावपूर्ण श्रद्धांजली !!! विनम्र अभिवादन !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!