आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथे शेतकरी मेळावा झाला संपन्न

तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )

वरोरा : - देशातील एकंदरीत कृषी संशोधनाचा आवाका बघता आता आपण अन्नसुरक्षेचे कडून पोषण सुरक्षेकडे जाणे गरजेचे असून त्यादृष्टीने राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थांच्या माध्यमातून  पोषण सुरक्षेकरिता संशोधन सुरू आहे, येणारा काळ हा पोषण सुरक्षेचा राहणार आहे त्या करीता सर्व शेती क्षेत्राने सज्ज राहणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अमोल कुमार सोळंके  यांनी वरोरा येथे आयोजित महिला शेतकरी मेळाव्यात केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषदे नवी दिल्ली च्या एस सी एस पी कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संस्था नवी दिल्ली, महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा, ध्रुव तारा  ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड वरोरा च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पर्वावर दिनांक ६ मार्च २०२२ रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालय वरोरा येथे महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचे अध्यक्षस्थान आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार यांनी भूषविले. अध्यक्षस्थानावरून बोलताना शेतीमधील महिलांचा सहभाग आणि त्याकरिता असलेल्या संशोधनाची गरज डॉ सुहास पोतदार यांनी बोलून दाखविली. मेळाव्यामध्ये महिला सक्षमीकरणा करिता कृषी विभागाच्या योजनांची माहिती मारुती वरभे कृषी पर्यवेक्षक भद्रावती यांनी दिली. कंपनीचे संचालक चंद्रशेखर झाडे यांनी महिला सक्षमीकरण काळाची गरज या विषयावर बोलतांना शेतीचा शोध हा महिलांनी लावला असून शेती वरती पहिला हक्क हा महिलांचा आहे असे मत मांडले. कृषी च्या क्षेत्रात एक महिला म्हणून फार मोठी जबाबदारी पार पाडत असताना शेतीमध्ये कशा पद्धतीने आपले योगदान वाढविता येईल यावर राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संस्थेच्या वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. एस.वी.अमिथा मित्रा यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्या मधे  श्री प्रवीण भांडारकर जिल्हा समन्वयक उमेद यांनी महिलांच्या आर्थिक साक्षर चळवळीचा ऊहापोह केला. शेतामध्ये काम करीत असताना महिलांना उपयोगी अश्या वस्तूंचे वाटप आयोजकांच्या वतीने करण्यात आले. 

मेळाव्याचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक किशोर डोंगरकर यांनी तर सुत्रसंचालन राहुल तायडे , आभारप्रदर्शन प्रशांत काकडे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्विते करिता अंशुल वर्मा तांत्रिक अधिकारी, भा. कृ. अ. प. नवी दिल्ली , कंपनीचे संचालक अभय पारखी, संदीप सोनेकर, नितीन आडे, उल्हास बोढे , विजय पावडे,  कृषी महाविद्यालयाचे डॉ. स्वप्नील पंचभाई,सौ.भारती भांडारकर,डॉ. रवींद्र बनकर यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!