जुनासुर्लात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून वाचनालय व ग्रामपंचायत इमारतीसाठी ५५ लाखाचा निधी
जुनासुर्लात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून वाचनालय व ग्रामपंचायत इमारतीसाठी ५५ लाखाचा निधी
जुनासुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर येथे २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले . साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय विजय वडेट्टीवार यांनी जुनासुर्ला येथे ३० लाखाचे वाचनालय व २५लाखाची ग्रामपंचायत इमारत उभारण्याची घोषणा केली .
२९वे झाडीबोली साहित्य संमेलन घेऊन शाखाध्यक्ष लक्ष्मण खोब्रागडे , स्वागताध्यक्ष रंजित समर्थ व कार्याध्यक्ष गणेश खोब्रागडे यांनी विदर्भाची मान उंचावली असून त्यांच्या कार्याने जुनासुर्ला गावाचा लौकिक व इतिहास जगासमोर आला .त्यांच्या जिद्दीचे व मेहनतीचे कौतुक करावे तितके कमी आहे . कोणताही शासकीय निधी न घेता उभारलेले संमेलन साहित्याच्या प्रामाणिक सेवेचे उदाहरण आहे .झाडीची उज्ज्वल परंपरा मराठीचे सोनेरी भविष्य दाखवेल असा आशावाद भाकीत करत पालकमंत्र्यांनी झाडीच्या दैदिप्यमान कार्याचा छोटासा भाग म्हणून ही घोषणा करताना अभिमान व्यक्त केला .
पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेचे सर्व स्तरावरून स्वागत होत असून अभिनंदन करण्यात येत आहे . ग्रामीण भागात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी माननीय विजय वडेट्टीवार यांनी उचललेले पाऊल विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला खतपाणी घालणारे ठरेल . पालकमंत्र्यांच्या या घोषणेचे अनेकांनी स्वागत करीत जुनासुर्लावासीयांतर्फे आभार मानले .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!