झाडीबोली साहित्याकडे संशोधक वृत्तीने पाहण्याची गरज आहे- संमेलनाध्यक्ष डाॅ.मनोहर नरांजे
झाडीबोली साहित्याकडे संशोधक वृत्तीने पाहण्याची गरज आहे- संमेलनाध्यक्ष डाॅ.मनोहर नरांजे
जुनासुर्ला येथील २९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे थाटात उदघाटन
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती
प्रतिनिधी
मूल चंद्रपूर
झाडीबोली भाषा ही केवळ चार जिल्ह्यापुरती मर्यादित नसून तिचा विस्तार बराच मोठा आहे. मी नागपूर जिल्ह्यातील झाडीबोली चळवळीचे नेतृत्व करतो. डाॅ. हरिश्चंद्र बोरकरांनी अध्यक्षपदाची धुरा माझ्या खांद्यावर सोपवितांना बर्याच जबाबदार्या आल्या आहेत . झाडीबोलीस एका समृद्ध कलापरंपरेचा संपन्न वारसा लाभलेला आहे.म्हणून झाडीबोलीतील साहित्याकडे संशोधक वृत्तीने पाहण्याची गरज आहे असे प्रतिपादन २९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. मनोहर नरांजे यांनी जुनासुर्ला येथे केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्यालयातील मा.सा.कन्नमवार साहित्य नगरीत दि. १२ मार्च रोजी झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीच्या वतीने आयोजित २९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी झाडीबोली चळवळीचे प्रवर्तक व संशोधन महर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर, संमेलनाध्यक्ष डॉ. मनोहर नरांजे, पूर्वाध्यक्ष डाॅ.संजय निंबेकर, ज्येष्ठ साहित्यिक हिरामन लांजे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, अॅड. लखनसिंह कटरे, कवयित्री अंजनाबाई खुणे, संतकवी डोमा कापगते, ना.गो.थुटे, मिलींद रंगारी, माजी आमदार डाॅ.हेमकृष्ण कापगते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, घनश्याम येनूरकर,रत्नमाला भोयर, राकेश रत्नावार, विनोद अहिरकर, अखिल गांगरेड्डीवार, राजू मारकवार, वासुदेव समर्थ, राजू गोवर्धन,शिल्पा पेरकिवार, विनायक बुग्गावार, नथ्थू आरेकर, रिना भोयर, सारिका भूमलवार, मुरलीधर लोडेल्लीवार, जितेंद्र लेनगुरे, उद्धव नारनवरे व सर्व पूर्वाध्यक्ष यांच्या उपस्थितीत पार पडले.
बोलीभाषेनी मानसं जोडली जातात - ना. विजय वडेट्टीवार
आपल्याला आपली ओळख करून देते ती आपली बोलीभाषा. झाडीबोली चा गोडवा मोठा असून गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सारख्या संतांनी जनप्रबोधनसाठी बोलीचा उपयोग केला आहे. या बोलीस नावलौकिक मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य झाडीबोली साहित्य मंडळ सातत्याने करीत आहे, हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवर यांनी यावेळी केले. येथे होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सार्वजनिक वाचनालयासाठी ३० लाखाच्या अनुदानाची घोषणा देखील त्यांनी केली.
संस्थापक अध्यक्ष डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी भूमिका मांडतांना झाडीबोली जिवंत ठेवण्याचे काम ग्रामीण भागातील लोकच करू शकतात असे सांगतांना झाडीबोलीला पुढे चांगले दिवस येतील असे सांगितले.तसेच अधिकाधिक लेखन हे झाडीबोलीतूनच करा असे नवोदित लेखकांना आवाहन केले.
यावेळी पूर्वाध्यक्ष संजय निंबेकर यांनी आपले अनुभव कथन करून या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मनोहर नरांजे यांना ताम्रपट देवून कारभार सोपवला. संमेलनाची सुरूवात पुस्तक पोहा या अभिनव उपक्रमाने करण्यात आली.यात ग्रामपरिसरातील लोककलावंतांनी आपल्या परिसरातील विविध लोककलांचे अतिशय सुरेख पद्धतीने सादरीकरण केले. झाडीगौरव गीत शाहिर नंदकुमार मसराम व त्यांची सुकन्या यांनी सादर केले. तसेच ज्येष्ठ रंगकर्मी डाॅ.परशुराम खुणे व ज्येष्ठ साहित्यिक अॅड.लखनसिंह कटरे यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. तसेच विविध प्रकारचे परिसंवाद सादर करण्यात आले.
आदव्याची सुपारी स्वागताध्यक्ष रंजित समर्थ यांनी दिली . यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी हिरालाल पेंटर, सुधाकर मार्गोनवार, रामकृष्ण चनकापूरे, गौरव मर्लेवार, कुंजीराम गोंधळे आदींचा व अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक बंडोपंत बोढेकर यांनी तर सुत्रसंचालन व स्वागतगीत गायन विद्या कोसे देवगडे यांनी केले. आभार प्रदर्शन रत्नाकर चौधरी यांनी केले.यशस्वीतेसाठी संमेलनाचे आयोजक व साहित्य मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर चंद्रपूर, शाखाध्यक्ष धनराज खानोरकर, लक्ष्मण खोब्रागडे, रंजित समर्थ, कार्याध्यक्ष गणेश खोब्रागडे, सहकार्याध्यक्ष खुशाल टेकाम व झाडीबोली साहित्य मंडळाचे सर्व सदस्य, आश्रयदाते व जुनासुर्ला गावचे सर्व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
१) संमेलनाचे विविध मांडो :-
झाडीपट्टीतील मान्यवरांच्या स्मृतीप्रित्यर्थ संमेलनात विविध मांडो तयार करण्यात आले आहेत. त्यात गीताचार्य तुकाराम दादा, बाबुराव वरघंटे, एकनाथ साळवे, वि.वा.जोशी, अरूणा पवार, विनोद मोरांडे, वा.ना.निगम, आचार्य लक्ष्मणदादादा नारखेडे, टी.टी. जुलमे, क.ब.पेंदे मांडवांचा समावेश आहे.
विविध पुस्तकांचे प्रकाशन
याचवेळी लखनसिंह कटरे यांचे 'गावखारी व कामथ',लक्ष्मण खोब्रागडे यांचे 'यश खेचून आणू दारी', प्रशांत भंडारे यांचे 'कवडसा', शितल कर्णेवार यांचे' मौनाचे अत्तर' संगिता बढे, किरण चौधरी, उज्वला कोल्हे यांचे 'त्रिवेणींचा संगम' प्रिती जगझाप यांचे' बालगीतांचा खजिना', संत डोमा कापगते यांचे 'दिव्यांश भजनावली' दिवाकर मोरस्कर यांचे 'व्याघ्र दर्शन', शशिकला गावतुरे यांचे 'बालकाव्य कुंज',पंडीत लोंढे यांचे 'वळण' आदी पुस्तकांचे प्रकाशन झाले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!