महासती बेनाबाईची यात्रा
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील लोणारा व कुर्झा येथे दर तीन वर्षातून एकदा महासती बेनाबाईची यात्रा होत असते.सन २०२२ या वर्षी ही यात्रा दिनांक ०८ आणि ०९ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे.महासती बेनाबाई ही कुणबी समाजातील फुंडे आणि हुकरे परिवाराचे कुलदैवत मानले जाते.कुर्झा आणि लोणारा येथे तिचे मंदिर आहे.यात्रेनिमित्त महासती बेनाबाईच्या दर्शनाला मध्यप्रदेश.छत्तीसगढ,तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात.गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील भाविकांची संख्या सर्वाधिक असते.लोणारा व कुर्झा येथील महासती बेनाबाईच्या मंदिराने भाविकांना भुरळ घातली असून यात्रेकरूंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
यात्रेची आख्यायिका
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुका व मध्यप्रदेशचा काही भाग पूर्वी ' लांजी ' या नावाने ओळखला जात असे.या भागातील करंजी गावात बेनाबाईचे वडील गंगोबा फुंडे आणि आई सगनावती राहत होते.या गावात कुणबी समाजाचे केवळ एकच घर असल्याची माहिती आहे.इतर घरे मात्र गवळी समाजाची होती. बेनाबाईच्या अंगी दैवी शक्ती असल्याने तिचे वागणे गवळी समाजाला खटकत असायचे,असे मानले जाते.एके दिवशी खेळत असतांना मैत्रिणी सोबत बेनाबाईचे भांडण झाले.गवळ्याच्या मुलीला बेनाबाईने शेणामातीचे गोळे फेकून मारले.यावरून गवळी समाज बेनाबाईच्या घराण्याचा छळ करू लागली.शेवटी गवळ्यांच्या जाचाला कंटाळून बेनाबाईच्या आई - वडिलांनी करंजी गाव सोडले.त्यानंतर ते पवनी तालुक्यातील इटगाव येथे वास्तव्यास आले.इटगाव येथे राहत असतांना जवळच्या कुर्झा येथील मैरोबा शिवबा हुकरे यांचे सोबत बेनाबाईचा विवाह झाला.सासरच्या मंडळीकडून बेनाबाईचा अनन्वित छळ केला जात असे.बेनाबाईचे सासर श्रीमंत असले तरी घरातील सर्व कामे एकट्या बेनाबाईलाच करावी लागत होती.लग्नानंतर अल्पावधीतच प्रकृर्ती अस्वास्थ्यामुळे बेनाबाईचे पती मैरोबा यांचे निधन झाले. मैरोबांच्या चितेस कुर्झा येथील आखरावर अग्नी संस्कार करण्यात आले.याच चितेत बेनाबाई सती गेली.तेंव्हापासून बेनाबाई 'महासती बेनाबाई' या नावाने ओळखली जाऊ लागली.लोणारा हे गांव 'बेनाबाईचा लोणारा' तसेच कुर्झा हे गाव सुद्धा ' बेनाबाईचा कुर्झा ' या नावाने ओळखले जाते.ज्या ठिकाणी चितेला अग्नी देण्यात आला त्या ठिकाणी दोन शिळा कोम्बाच्या स्वरुपात बाहेर आल्या.त्याच ठिकाणी महासती बेनाबाईचे मंदिर उभारण्यात आले आहे.बेनाबाईचे मूळ माहेर इटगाव असून कुर्झा हे सासर आहे.परंतु बेनाबाई व त्यांचे पती यांच्या निधनानंतर बेनाबाईच्या सासऱ्याने कुर्झा येथून लोणारा येथे स्थलांतर केले.तेंव्हापासून कुर्झा हे माहेर तर लोणारा हे सासर मानले जात आहे.
यात्रेची जय्यत तयारी
यात्रेच्या दिवशी लोणारा येथून बेनाबाईची पालखी कुर्झा येथील मंदिरात आणली जाते.यावर्षी ही पालखी ७ फेब्रुवारीला सायंकाळी ०७.३० वाजता कुर्झा येथे वाजत-गाजत आणली जाईल. बेनाबाईच्या मंदिरात रात्रभर भजन - पूजन सुरु असते.भजन - पूजनाने भाविक मंडळी भारावून जातात.सध्या कुर्झा येथे जत्रेची जय्यत तयारी सुरु असून गावकरी श्रमदान करून गावाच्या सुशोभीकरणात गुंतली आहेत. ही यात्रा लोणारा व कुर्झा वासियांकरिता दसरा - दिवाळी सारखी असते.लोणारा व कुर्झा येथील बेनाबाईची यात्रा ही भंडारा जिल्ह्यातील मोठी यात्रा असून दर तीन वर्षातून एकदा भरत असते.या यात्रेसाठी पोलीस विभाग ,परिवहन महामंडळ, तालुका प्रशासन आणि आरोग्य विभाग सज्ज असतात.प्रत्येक वेळेस यात्रेला वाढता प्रतिसाद मिळत असून मागील काही वर्षापासून राजकीय पक्षांचे पोस्टर्स सुद्धा लावले जात आहेत.यात्रे निमित्त गावात नाटके, भारुड, गोंधळ, तमाशा,कव्वाली यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.रेतीघाटाच्या सततच्या रहदारी मुळे रस्त्यांची दुरवस्था असल्याने यात्रेकरूंना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे.भाविकांनी यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!