भिसी ग्रामपंचायतमध्ये नळाच्या पाण्यासाठी महिलांचा ठिय्या..
सहा महिन्यांपासून नळाला पाणी येत नसल्यामुळे महिलांचा आक्रमक पवित्रा टिल्लू पम्प बंद करण्याचीही मागणी
तालूका प्रतीनीधी
(केवलसिंग जुनी)
भिसी :
येथील वॉर्ड क्रमांक एक व दोन मधील रहिवासी आठ ते दहा महिलांनी नळाच्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये ठिय्या धरला. जोपर्यंत आमच्या नळाचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असा पवित्रा मंगळवारी 11 वाजता ग्रामपंचायत मध्ये उपस्थित महिलांनी घेतला.सदर महिला सहा दिवसापूर्वीही ग्रामपंचायतमध्ये नळाच्या पाण्याच्या समस्यासाठी ठाण मांडून बसल्या होत्या.
तक्रारकर्त्या महिलांच्या म्हणण्यानुसार दिवाळीपासून आमच्या नळाला पाणी येत नाही, कारण मुख्य पाईप लाईनवर सात – आठ नागरिकांना कनेक्शन देण्यात आले. शिवाय काही लोकं नळाला मोटर ( टिल्लू पम्प ) लावून पाणी भरतात.आमचे नळ कनेक्शन छोट्या पाईपलाईनवरून असल्यामुळे आमच्या नळाला मुळीच पाणी येत नाही. म्हणून आम्हालाही मुख्य पाईपलाइनवरून जोडणी द्या किंवा सगळ्यांना वितरण लाईनवरून जोडणी द्या, अशी मागणी महिलांनी केली आहे.
तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत प्रशासनाला अर्ज देऊनही न्याय न मिळाल्यामुळे महिला संतप्त झाल्या आहेत. भर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करून महिला मेटकुटीस आल्यामुळे महिलांनी ग्रामपंचायत मध्येच ठिय्या धरला.
तक्रार कर्त्या महिलांनी ग्रा. पं. ला दिलेला अर्ज
ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी मुख्य लाईनवर असलेल्या नळ जोडणीची तपासणी करण्यासाठी खोदकाम करायला गेले असता ज्यांची मुख्य लाईनवरून जोडणी असल्याचा आरोप महिलांनी केला तेच जोडणीधारक कर्मचाऱ्यांना खोदकाम करण्यासाठी अडवत आहेत, अशी माहिती पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या कैलास शिवरकर या रोजंदारीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याने दिली.वॉर्ड क्रमांक एक मधील देवीदास कोटनाके यांचा नळ अडीच वर्षांपासून बंद आहे. अनेकदा तक्रारी करूनही पाईपलाइन दुरुस्त केल्या जात नाही. एकंदरीत ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचा संताप वाढतच चालला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!