राष्ट्रसंताचे भजनसाथी केशवराव म्हैसकर - सच्चे प्रचारव्रती



चिमूर  (जि. चंद्रपूर )
जवळचे मांगलगाव हे केशवराव म्हैसकर (मसराम ) यांचे जन्मगाव . ते  अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक  होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.   परवा दि.३/५/२०२१ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.ते   ७५ वर्षाचे होते.
   एकदा वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज मांगलगाव ( ता.चिमूर ) येथे कार्यक्रमासाठी आले असता चिमूर भागातील तत्कालीन ज्येष्ठ  श्रीगुरूदेव  प्रचारक अर्जुन आर्य भारतीय [अब्दूल शेख] यांनी  उत्साही बाल केशवराव ची  महाराजांना ओळख करून दिली होती. त्यावेळी केशवराव हे १४ वर्षाचे होते. वं. महाराजांच्या खंजेरी भजनांने प्रभावीत  होऊन म्हैसकर यांनी ब्रम्हपुरी येथे आयोजित श्रीगुरूदेव प्रचार प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी भजन गायन ,खंजेरी वादन आणि चटया विणण्याचे प्रशिक्षण  घेतले होते. पुढे राष्ट्रसंताच्याच पावन  उपस्थितीत खातगाव( अंतरगाव ) येथे केशवरावजींचा विवाह झाला होता. संयुक्त कुटूंबात ते मोठे झाले. त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. शेतजमीन अत्यल्प असल्याने ते घरी लव्हाळापासून चटया विणून  गावोगावी विकायचे आणि  आपला कसाबसा  प्रपंच  करायचे . 
 राष्ट्रसंताच्या शेवटच्या काही वर्षात त्यांंनी  भजनसाथी म्हणून उत्तम सेवा दिली. त्यांचेसोबत अनेक भागात फिरले.   खंजेरी वादन कला त्यांनी साध्य केली होती.महाराजांच्या पश्चात  श्रीगुरूदेव तत्त्वप्रणालीच्या प्रचारार्थ  अर्जुन आर्य यांनी एक  भजन टोळी तयार केली.आणि त्यात केशवरावजीला  भजनप्रमुख केले होते. त्याकाळी अर्जुन आर्य हे गावोगावी  प्रवचन करायचे तर  त्यानंतरचे भजनांचे सत्र केशवरावजी सांभाळायचे, अशा पध्दतीने चिमूर सिंदेवाही नागभीड या  झाडीपट्टी प्रातांत त्यांनी राष्ट्रसंताच्या मानवतावादी विचारांचा प्रचार प्रसार केला . अर्जुन आर्य च्या निर्वाणानंतर ते वैयक्तिकरित्या गावोगावी जाऊन सामुदायिक प्रार्थना , खंजेरी भजन कार्यक्रमास चालना देत असत. गुरूकुंज आश्रमाच्या वतीने  काढण्यात येणाऱ्या आॕगष्ट क्रांती ज्योत यात्रा , ग्रामजयंती यात्रा , पंढरपूर पालखी यात्रेत ते उत्स्फुर्तपणे सहभागी होत असत.  तसेच दरवर्षी  गुरूकुंजात होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवाचे शेवटच्या दिवशी सांयकालीन सत्रात त्यांचे खंजेरी भजन गायन  होत असे.  घरची आर्थिक  परिस्थिती नाजुक असूनही त्याचे दुःख न मानता राष्ट्रसंताचे महान सानिध्य आपल्या आयुष्यात मिळाले , ही आपल्याला मिळालेली सर्वांत मोठी  संपत्ती आहे, असे ते मानत. पद, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी पासून ते सदैव दूर राहिले आणि  शेवटच्या श्वासापर्यंत श्रीगुरूदेव विचारांचेच चिंतन केले."रख दुःख के संसारमें  तब तो पुकारेंगे तुम्हे " हेच मागणे केशवरावजींनी श्रीगुरूदेवांना मागले असावे.
   एकंदरीत आपल्या झाडीपट्टीतील सरळपणाचे  जीवन  जगणारा  श्रेष्ठ खंजेरीवादक आणि सच्चा श्रीगुरूदेव प्रचारक आम्ही त्यांच्या  रूपात  गमावलो आहे .त्यांच्या कार्यस्मृतींना विनम्र अभिवादन .........
.......बंडोपंत बोढेकर ,चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!