केवढा हा विरोधाभास!
'नाव सोनूबाई,हाती कथलाचा वाळा'
शाळेत असताना कधीतरी वाचलेली म्हण.जाणीवपूर्वक नीट लक्ष देऊन आजूबाजूला नजर टाकली तर हेच तर दिसतं. फार दूरची गोष्ट कशाला घ्यायची!आता आपल्या विकासचीच गोष्ट घ्या ना.किती धुमधडाक्यात स्वागत केले गेले होते ना विकासच्या जन्माचे!अगदी सनई -चौघड्यांच्या गजरात... विकासने नंतर छान बाळसे धरले.रांगायला लागला,ताठ उभा राहिला आणि शर्यतीत अनेकांना मागे टाकत धावायला लागला.विकासच्या अद्भूत,सुरसआणि चमत्कारिक कथांची पारायणं झालीत,पण हे सर्व केवळ आभासी कारण विकास शोधूनही सापडला नाही.(विकासने बहुदा सर्व अगदी गुप्तपणे केले.त्याला प्रसिद्धीचा हव्यास नसावा हे त्यामागचे मूळ कारण!)एकदा घरातली लहान मुले धावत आली अन् म्हणायला लागलीत आम्ही जिंकलो,आम्ही जिंकलो,आम्ही जास्त गोल केलेत.खूप आनंद झाला.पण हा आनंद क्षणभंगूर ठरला कारण गोल प्रत्यक्ष मैदानात केलेले नव्हते तर,मोबाईलवरील गेम खेळताना हे गोल मुलांनी केलेले होते.विकासच्या बाबतीत तसेच झाले ना!विकास शोधता सापडेना,पण विकास ला समोर उभे केले अन् दाखवले.हा बघा पूर्ण वाढ झालेला विकास... चकाचक मॉल्स,दोन पदरी रस्त्याचे चार पदरी रस्ते,उड्डाण पूल्स,मेट्रो,गगनचुंबी इमारती,अंतराळ मोहिमा आणखी बरेच काही.हा विकास आधुनिक अर्थव्यवस्था गती घेत असल्याचे चित्र उभे करतो यात शंका नाही.पण हा खरा विकास आहे काय?खरा विकास या प्रगतीच्या पलीकडे व मुलभूत असतो.अन्न,वस्त्र,निवारा यापलीकडे मानवी मनाचा स्वातंत्र्य व सहजतेच्या वातावरणात झालेला विकास म्हणजेच खरा विकास होय.अन्याय अत्याचाराला मूक संमती असणे,शोषणासमोर गुडघे टेकणे,ते मान्य करणे,गुलामीमध्ये जगणे निमूटपणे सहन करणे,स्त्रियांवर अत्याचार करून,मारून टाकून तिच्या अब्रूचे धिंडवडे उडवणे,सत्याचा आवाज दाबून,असत्याचा उच्च आवाजात जयघोष करणे या व अशा संस्कृतीचे परिवर्तन हाच विकासाचा मार्ग आहे.सत्य बोलायला गेलो तर देशद्रोहाची टांगती तलवार.केव्हा मान कापल्या जाईल याची शाश्वती नाही.अन् म्हणे विकास झाला.किती हा विरोधाभास...!
हे सर्व बोलण्याचे कारण वृत्तपत्रामधील बातमीने लक्ष वेधून घेतले.त्यात कोरोना काळात राज्यात झालेल्या मृत्यूंचा तक्ता देण्यात आला होता.ज्यात सर्वाधिक मृत्यू मुंबईत,तर सर्वात कमी मृत्यू गडचिरोलीला झाले असे लिहिलेले होते.बातमी वाचली अन् मी भूतकाळात गेले.२०१०-११ मधे अभ्यासाचा एक भाग म्हणून आदिवासी, नक्षलवादी भागात गेले होते.तेव्हा प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीला गेले,अभय बंग आणि राणी बंग यांच्या शोध ग्रामचे काम पाहिले.मेंढा (लेखा)येथे जाऊन देवाजी तोफा यांना भेटले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.अगदीच बारिक अंगकाठी,चार साडेचार फुट उंची,इयत्ता चवथीपर्यंत शिकलेल्या या व्यक्तीच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे.ह्या गावची ग्रामसभा ही एकमेव असावी जिथे ग्रामसभेला शंभर टक्के उपस्थिती असते. स्त्रियांनी ग्रामसभेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे.आपल्या विकासाची कल्पना सुरुवातीला उल्लेख केलेल्या भ्रामक संकल्पनेवर तोललेली असेल तर,विकासाचा मागमूसही तुम्हाला या गावाला दृष्टीस येणार नाही.कारण अवघे पाचशे लोकवस्तीचे हे गाव.गावात कुटाराने बांधलेल्या झोपडया,मातीच्या भिंती,कौलं आणि त्यावर पेंढा.झोपडीसमोर बांधलेल्या चार शेळ्या- मेंढया अन् एक दोन गायी म्हशी असं चित्र.पण खऱ्या विकासला भेटायचे असेल तर,मेंढा(लेखा) या गावाला नक्की जाऊन या.
देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्रातलं सरकार गावात अवतरलं ते,मेंढा(लेखा) येथे.मोहन हिराबाई हिरालालआणि देवाजी तोफा या ज्येष्ठ समाज सेवकांनी ही किमया घडवून आणली.
'दिल्ली मुंबई मावा सरकार,मावानाटे माटे सरकार'
'दिल्ली मुंबई आमचे सरकार,आमच्या गावात आम्हीच सरकार'.
'दिल्ली मुंबई में हमारी सरकार,हमारे गाव में हम ही सरकार.'ही आहे स्वयंशासनासाठी लोकांनी दिलेली घोषणा.हे असे गाव आहे की, ज्या गावाने ग्रामसभा सर्वोच्च मानून स्वतःचे निर्णय बहूमताने नाही तर,सर्वसहमतीने घेण्याचा निर्णय घेतला.ग्रामसभेत प्रत्येकाला विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे.महिला व पुरुषांना मत व्यक्त करण्याचा समान अधिकार आहे.देवाजी तोफा यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आम्ही छान झोपडीत बसलेले होतो,जिथे ग्रामसभा भरते.देवाजी माहिती देत होते.चर्चा सुरू असताना आमच्यापैकी कुणीतरी एकजण म्हणाला,तुमचा भाग खूपच मागासलेला आहे.इथली लोक पाहिली,हा तुमचा भाग पाहिला की,ते लक्षात येतं.आमच्याकडे खूप सुधारणा झालेल्या आहेत.ह्या शब्दांनी जणू तोफेला बत्ती दिली अन् देवाजींच्या तोफेतून झालेल्या,माऱ्याने सारेजण गारद झाले.देवाजी म्हणाले,शहरांमध्ये अगदी सहज ऑनर किलिंग घडतं.आमच्या इथे ऑनर किलिंग हा प्रकारच नाही.मग त्यांनी'गोटूल'बद्दल माहिती दिली.'गोटूल'ही तरुण आणि तरुणींनी एकत्र येऊन आपला जीवनसाथी निवडावा यासाठी एकत्र येण्याची जागा आहे.ही एक अशी झोपडी आहे,जिथे तरूण-तरूणी नाचतात,गातात आणि आपल्याला आवडलेल्या तरुण -तरुणीची निवड जीवनसाथी म्हणून करतात. तुमच्या विकास झालेल्या भागात तरूण-तरुणींना हा अधिकार आहे का?आमच्या भागातील स्त्रिया ब्लाऊज घालत नाहीत.जी साडी घातलेली असते तीसुद्धा अशाप्रकारे की,ज्यातून पूर्ण पाय उघडे पडलेले दिसतात.तरीही आमच्याकडे स्त्रियांवर बलात्कार होत नाहीत.व्यसनांवरही अंकुश आला आहे.कुणाचा विकास झालेला आणि कोण अविकसित?कोण सुसंस्कृत आणि कोण असंस्कृत?त्यांच्या माऱ्याने सारेच गारद झाले.आम्ही सुधारलेले,सुसंस्कृत,विकसित आहोत हा जो गैरसमज होता,त्याची धुंदी क्षणात उतरली.समाजाने ठरवलेल्या सौंदर्याच्या व्याख्येप्रमाणे,केवळ चेहऱ्याच्या सौंदर्याला सुंदर समजणे.मनाने सुंदर असलेल्या चेहऱ्याला मात्र व्याख्येत न बसल्यामुळे कुरूप समजणे,मनाच्या श्रीमंतीपेक्षा,पैशाच्या श्रीमंतीला महत्त्व देणे,दगडाच्या मूर्तीची पूजा करणारा संस्कारी,धर्मशील आणि माणसांमध्ये देव पाहणारा,पण दगड न पुजणारा मात्र संस्कारहीन... संकल्पनांच्या रूढ व्याख्या खरे तर बदलायला हव्यात.विचार करा प्रत्यक्षात सत्य आणि आभास यात किती हा विरोधाभास...!
डॉ. स्वप्ना लांडे
अकोला



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!