ब्रम्हपुरीचे ढेपाळलेले प्रशासन!
संपादकीय
ब्रम्हपुरीचे ढेपाळलेले प्रशासन!
आपल्या परिसरातील नेता ‘सत्तारूढ’ झाल्यास, आपल्याला न्याय मिळेल, आपल्यावरील अन्यायाचा बदला न्यायात घेता येईल, विकासाचे चक्र गतीमान होऊन, सामाजीक आणि आर्थिक उन्नती साधता अशी भाबळी आशा सार्यांमध्येच असते. अनेकदा तसे होतेही, मात्र अलिकडच्या काही घटनांचा मागोवा घेतल्यास, ब्रम्हपुरी वासीयांच्या स्वप्नांचा भ्रम कायमच राहील की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
विदर्भाचा ‘ढाण्या’ वाघ अशी प्रतिमा निर्माण केलेले राज्यांचे मदत आणि पुर्नवसन मंत्री तथा पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार, आपल्या मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करतील काय? या प्रश्नाचे उत्तर कालांतरणाने मिळेलच (जसे, चिमूर, ब्रम्हपुरी जिल्ह्याची निर्मीती, नेरी, भिसी, पाथरी तालुक्याची निर्मीतीचे उत्तर मिळाले तसे नसावे ही अपेक्षा!!) मात्र सध्याची ब्रम्हपुरीची ढेपाळत चाललेली प्रशासकीय यंत्रणेवर वचक बसवून सामान्याना न्याय देणारी तयार केली तरी, त्यांना दिलेल्या मताचे सार्थक मतदारांना होईल.
ब्रम्हपुरी तालुका तसा, चंद्रपूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांहून अनेक बाबतीत वेगळा असलेला, स्वताचेच विचारांने जगणारा तालुका आहे. या तालुक्याच्या विकासात आणि हवेतही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आणि तुकारामदादा गिताचार्य यांचे कर्तृत्व फुललेले आहे. उद्योगविरहीत, प्रदुषण मुक्त असलेल्या या तालुक्यातील सांस्कृतीक पंरपरा, शिक्षण आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधा इतर तालुक्याच्या तुलनेत बर्यापैकी आहे. यामुळेच येथील जनताही शांत, सयंमी आणि वैचारीकदृष्टया परिपक्व आहे.
पालकमंत्र्याचे क्षेत्र न्यायाने आणि कायद्याने चालायला हवे यावर कुणाचेही दुमत नसावे. रेती तस्कर, दारू तस्करांच्या मुसक्या प्रशासनाने बांधवे अशी पालकमंत्रीसह, कायदा आणि न्यायप्रिय साÚयांच्याच अपेक्षा असणे हेही चुकीचे नाही. मात्र ब्रम्हपुरीचे एकूण प्रशासकीय कार्यालयाचे परिसरात फिरकले तर, असे चित्र कुठेही बघायला मिळत नाही. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना किंवा महाविकास आघाडी यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यांकरीता प्रशासकीय यंत्रणा भाजप वर्तुळाच्या सांगण्यावरून तसे वागत आहेत कि, ‘वरून’च त्यांना ‘तसे’ संकेत मिळत आहे? या प्रश्नाचे उत्तर अधिकारीच देवू शकत असले तरी, ही यंत्रणा सामान्याना न्याय देत नाही यावर कुणाचेही दुमत नाही.
लाॅकडाऊच्या काळात, लग्नाचे परवाणगीसाठी महसूल विभागात चालू असलेला भ्रष्टाचाराचे विरोधात बोलले म्हणून, आमदारकीची निवडणूक लढविलेले आणि सातत्याने गरीबांचे प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेणारे काॅ. विनोद झोडगे यांचेवर प्रशासनाकडून गुन्हा दाखल करून, सरईत गुन्हेगारासारखी वागणूक अधिकारी कुणाच्या दबावाशिवाय देतील यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. ब्रम्हपुरीच्या राजकीय वर्तुळात गरीबांचा आवाजाला आपल्या हिमंतीने ताकद देणार्यांवर जेलात जावे लागले, हा प्रशासनाच्या अहंभावनेचा विजय असला तरी, प्रशासनातील संवेदनशीलतेचा अंत होत असल्यांचा प्रकार आहे.
अलिकडेच ब्रम्हपुरी तालुक्यात मानवनिर्मीत महापूर आला. या महापूरात तालुक्यातील हजारो लोकांचे करोडो रूपयाची हानी झाली. राज्यकर्तांनी तर या सुलतानी संकटाकडे दुर्लक्ष केलेच, मात्र तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणाही जनतेच्या दुःखाशी समरस झालेली दिसली नाही. ‘तोंड’ पाहून सर्वे करण्यांची शासकीय ‘तर्हा’ येथेही दिसून आली. जुनी खरकाळाचे उदाहरण ताजे आहे. आम आदमी पार्टीच्या नेत्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात गावकर्यांनी ब्रम्हपुरीचे तहसिलदार यांचेकडे गेल्यानंतर, अधिकार्यांनी, सर्वेत चुक झाल्यांचे मान्य केले, नविन टिम तयार करून, पुन्हा सर्वे करण्यांचे आदेश झालेत. याचाच अर्थ एवढी मोठी हानी तालुक्यातील गरीब जनता, शेतकरी सहन करीत असतांनाही प्रशासनात सवेंदनशीलता का नाही? आपलेकडे एक म्हण आहे, ‘राजा बोले, दाढी हाले’ याचा अर्थ राजा जसे सांगेल, तसे त्यांचे अधिनस्थानी वागायचे. इथे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे अधिनस्थ असलेले अधिकारी, असवेंदनशील वागत आहेत, याचा अर्थ काय धरायचा?
तालुक्यात मोठया प्रमाणावर अवैद्य रेतीचे उत्खनन सुरू आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे गृहक्षेत्र रेती तस्करीचे ‘हब’ झाले आहे. फोटो, व्हिडीओसह बातम्याही प्रकाशीत झाल्यात, मात्र प्रशासनाकडून या तस्करांवर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याबाबत लेखी तक्रारी दाखल करूनही, प्रशासन ढिम्म आहे. नदीतून यांत्रिक साधनानी उत्खनन करता येणार नाही, असे केंद्र शासनाचे, राज्य शासनाचेच नव्हे तर, सर्वोच्च न्यायालयाचेही ‘गाईड लाईन’ आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात मात्र दिवसरात्र, रेती तस्करांनी उधान माजविले असून, स्वतःसकट, प्रशासनाचेही ‘अच्छे दिन’ आणले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!